Monsoon 2020 Forecast: 16 मे पर्यंत मान्सून अंदमानात धडकणार; मुंबईत 'या' दिवशी पावसाळा सुरु होण्याची शक्यता
यानुसार,साधारण 11 जून पर्यंत पाऊस मुंबईत (Mumbai Monsoon) धडक देऊ शकतो.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारा पाऊस यंदा 16 मेपर्यंत अंदमान- निकोबार बेटे (Andman- Nicobar Islands) आणि बंगालच्या उपसागरात दाखल होऊ शकतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा पूर्ण चार दिवस पाऊस लवकर येणार असल्याचे सध्याचे अंदाज आहेत. अंदमान येथे पाऊस दाखल होताच आठवडाभरानंतर केरळ (Kerala) मध्ये धडकतो आणि मग पुढे देशभरात पावसाळा सुरु होतो. यंदा या वेळापत्रकानुसार जर अंदाज बांधायचे झाले तर मुंबईत पाऊस साधारणपणे जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. साधारण 11 जून पर्यंत पाऊस मुंबईत (Mumbai Monsoon) धडक देऊ शकतो. याशिवाय उत्तर आणि पश्चिम भारतात 8 जुलै पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दिल्ली (Monsoon In Delhi) मध्ये यंदा 27 जून ला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या मान्सून हंगामात भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ आहे. या काळात भारतात अंदाजे 70% पाऊस होतो. यंदा या सरासरीच्या 96 ते 100% पाऊस बरसणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 1 जून पर्यंत जरी पाऊस केरळ मध्ये पोहचला तरी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होऊ शकतो.
दरम्यान, मोसमी पाऊस किंचित उशिराने सुरु असणार असला तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. 11 ते 15 मे दरम्यान हा पूर्वमोसमी पाऊस होऊ शकतो. कोकण भागात सुद्धा 14 मे रोजी विजेच्या कडकडाटांसह पाऊस होईल असे अंदाज आहेत. मागील काही दिवसात पुणे, मराठवाडा, बुलढाणा या भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला होता.