Modi Means Corruption: 'मोदी म्हणजे भ्रष्टाचार!' भाजप नेत्या खुशबू सुंदर ट्विट व्हायरल; राहुल यांच्या लोकसभा अपात्रतेचीही जोरदार चर्चा

या ट्विटमध्ये त्यांनी 'मोदी म्हणजे भ्रष्टाचार' (Modi Means Corruption) असे म्हटले आहे. तसेच, 'मोदी' या शब्दाची व्याख्या आता 'भ्रष्टाचार' अशी करावी, असेही त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.

Rahul Gandhi, Khushbu Sundar | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

Rahul Gandhi Defamation Case: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर भाजप नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) सदस्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांचे ट्विट व्हायरल झाले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी 'मोदी म्हणजे भ्रष्टाचार' (Modi Means Corruption) असे म्हटले आहे. तसेच, 'मोदी' या शब्दाची व्याख्या आता 'भ्रष्टाचार' अशी करावी, असेही त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत. काँग्रेसनेही या ट्विटची दखल घेत भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. खुशबू सुंदर यांचे ट्विटही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भलतेच चर्चेत आले आहे.

काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी खुशबू सुंदर यांचे ट्विट रिट्विट केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे ट्विट लाईक करत त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणारे भाजप नेते पुर्णेश मोदी यांना टॅगही केले आहे. विशेष म्हणजे इतके सगळे घडताना किंवा घडून गेल्यानंतर अद्यापही खुशबू सुंदर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा आपल्या ट्विटर टाईमलाईनवरुन ट्विट हटवले नाही. (हेही वाचा, Saamana On Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या शिक्षेवर दैनिक 'सामना' संपादकीयातून सवाल; 'चोराला चोर म्हटलं! हा काय गुन्हा झाला?')

काय म्हणाल्यात खुशबू सुंदर?

अभिनयातून राजकारणात आलेल्या खुशबू सुंदर यांनी हे ट्विट 2018 मध्ये केले आहे. हे ट्विट केले तेव्हा खुशबू सुंदर काँग्रेस पक्षात होत्या. पुढे त्यांनी भाजप प्रवेश केला. आपल्या ट्विटमध्ये खुशबू सुंदर यांनी हिंदीमध्ये केल्या ट्विटचा मराठी भावार्थ असा की, 'इथे तिथे सर्वत्र कुठेही पाहा मोदी... पण हे काय? प्रत्येक मोदीच्या पुढे भ्रष्टाचार आडनाव चिकटले आहे. चला मोदी आडनावाचा अर्थ आता भ्रष्टाचार असाच करुया'. या ट्विट सोबतच खुशबू सुंदर यांनी #Nirav #Lalit #Namo = Corruption.. असे सूत्र मांडत हॅशटॅगचाही वापर केला आहे.

काय आहे प्रकरण?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावावरुन केलेल्या टिप्पणी प्रकरणी दाखल मानहानी प्रकरणात सूरत कोर्टाने दोन वर्षंची शिक्षा सुनावली. लगोलग लोकसभा सचीवालयानेही राहुल गांधी यांना अपत्र ठरवत त्यांचे लोकसभा सदस्यत्व काढून घेतले. परिणामी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. या निर्णयामुळे विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई झाली आहे असे म्हणत काँग्रेसजनांनी याचा निषेध केला आहे. काँग्रेसने गांधींच्या अपात्रतेविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे, तर पक्ष सुरत न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.