मंत्री Nitin Gadkari यांची एक्स्ट्रा कमाई; YouTube द्वारे महिन्याला कमावत आहेत 4 लाख रुपये
या काळात अनेक गोष्टी बंद होत्या, लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. अशा स्थितीत अनेकांनी यूट्यूब (YouTube) किंवा इतर सोशल साईट्सवरून कमाईचे साधन शोधले
कोरोना व्हायरसच्या (coronavirus) काळात, गेल्या काही महिन्यांपासून देश आणि जगातील आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. या काळात अनेक गोष्टी बंद होत्या, लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. अशा स्थितीत अनेकांनी यूट्यूब (YouTube) किंवा इतर सोशल साईट्सवरून कमाईचे साधन शोधले. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनीही यूट्यूबवरून कमाई करण्याबाबत भाष्य केले आहे. ANI नुसार, नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, कोरोनाच्या काळात त्यांनी दोन गोष्टी केल्या, एक म्हणजे घरी स्वयंपाक बनवणे आणि दुसरे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्याख्याने देणे.
ते म्हणाले की, ‘त्या काळात मी अनेक व्याख्याने दिली. ती सर्व यूट्यूबवर अपलोड केली गेली. त्यांची दर्शक संख्या खूप जास्त आहे व आता यूट्यूब मला दरमहा 4 लाख रुपये देत आहे.’ अशाप्रकारे मंत्री नितीन गडकरी यांनी आपला वेळ सत्कारणी लावत एक्स्ट्रा कमाईचे नवे साधन शोधले आहे. त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जर्मनी-न्यूझीलंड-अमेरिकेसह अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली.
यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळत असतील आणि लोक ते जास्त काळासाठी बघत असतील, तर त्याद्वारे उत्तम कमाई केली जाऊ शकते. मात्र यासाठी तुम्हाला वरचेवर कंटेंट पोस्ट करणे गरजेचे आहे. व्ह्यूजमुळे व्हिडिओवर जाहिराती येतात आणि पैसे मिळतात. (हेही वाचा: PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; नीरजच्या भाल्याची 1 कोटी तर सिंधूची रॅकेट, राणी रामपालच्या हॉकीची आहे इतकी किंमत)
दरम्यान, आज नितीन गडकरी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री इंदूर येथील ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बांधकामाचा आढावा घेतला. येत्या 2-3 वर्षात हा एक्सप्रेस वे तयार होईल. ज्याद्वारे दिल्लीहून मुंबईला फक्त 12 तासात पोहोचता येईल. एक्सप्रेस वेवर जानेवारी 2023 पर्यंत 90,000 कोटी खर्च केले जातील. हा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे देशातील 5 राज्यांतून- दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र जाईल.