Meesho Jobs: नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी! ई-कॉमर्स कंपनी 'मीशो' देणार पाच लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार, जाणून घ्या सविस्तर
यातील 60 टक्क्यांहून अधिक नोकऱ्या टियर-III आणि टियर-IV क्षेत्रात असतील.
नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स फर्म मीशोने (Meesho) आगामी सणासुदीच्या काळात वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाच लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. मीशोने गेल्या वर्षी दिलेल्या रोजगारापेक्षा यंदाचे हे प्रमाण 50 टक्के अधिक आहे. यातील 60 टक्क्यांहून अधिक नोकऱ्या टियर-III आणि टियर-IV क्षेत्रात असतील. या नोकऱ्यांमध्ये प्रामुख्याने डिलिव्हरी-पिकिंग, सॉर्टिंग, लोडिंग, अनलोडिंग आणि रिटर्न यासारख्या कामांचा समावेश असेल. मीशोकडून दिले जाणारे हे रोजगार हंगामी असतील.
फुलफिलमेंट अॅण्ड एक्सपीरियंसचे मुख्य अनुभव अधिकारी सौरभ पांडे म्हणाले, 'या सणासुदीच्या काळात मागणीत भरीव वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या संधींची निर्मिती ही प्रामुख्याने, सणासुदीच्या काळात एकूण ग्राहक अनुभव वाढवण्यावर आणि असंख्य लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यावर केंद्रित आहे.' याव्यतिरिक्त, सणासुदीच्या हंगामासाठी आवश्यकतेचा भाग म्हणून मीशो आपल्या विक्रेत्यांसाठी तीन लाखांहून अधिक कर्मचारी नियुक्त करतील असा अंदाज आहे. (हेही वाचा: Amazon Great Indian Festival Sale 2023: या वर्षीच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची 2023 ची घोषणा; जाणून घ्या मिळणाऱ्या ऑफर्स आणि सवलती)
हे हंगामी कर्मचारी ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मीशोच्या विक्रेत्यांना उत्पादन, पॅकेजिंग आणि वर्गीकरण यासह विविध क्षमतांमध्ये मदत करतील. याशिवाय मीशोवरील 80 टक्क्यांहून अधिक विक्रेते नवीन उत्पादने सादर करू इच्छितात आणि फॅशन अॅक्सेसरीजसारख्या नवीन श्रेणींमध्ये व्यवसाय करू इच्छितात. कंपनी विक्रेत्यांना 30 टक्क्यांहून अधिक इन्व्हेंटरी वाढवण्यास सांगेल आणि स्टोरेज क्षमताही वाढवली जाईल जेणेकरून मागणी पूर्ण करू शकतील.
दरम्यान, येणाऱ्या सणासुदीच्या हंगामासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी आपला सेल जाहीर केला आहे. Amazon चा सर्वात मोठा सेल- Great Indian Festival Sale ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल. दुसरीकडे फ्लिपकार्टचाही बिग बिलियन डेज सेल लवकर सुरु होणार आहे.