Modi Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार? भाजपमध्ये विद्यमान केंद्रीय मंत्र्यात नाराजीची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM arendra Modi), अमित शाह, जेपी नड्डा (JP Nadda) आणि भाजपच्या एकूणच धुरीणांना याबाबत वेळीच काही बदल करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra ) आणि विविध राज्यांत बदललेली राजकीय परिस्थिती यामुळे लोकसभा निवडणूक 2024 जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह, जेपी नड्डा (JP Nadda) आणि भाजपच्या एकूणच धुरीणांना याबाबत वेळीच काही बदल करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले आहे. परिणामी केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार (Modi Cabinet Expansion) होऊ घातल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान अनेक मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे तर काहींच्या खात्यांची खांदेपालट होऊन रिक्त जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. ही संधीसुद्धा एक राजकीय तडजोडच असण्याची शक्यता आहे. कारण, भाजपने नव्याने जमवलेले मित्र आणि विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत केलेली हातमिळवणी पाहता त्या पक्ष/गटांनाही संधी देणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मंत्रिपदावरुन डच्चू मिळण्याच्या चर्चेमुळे अनेक केंद्रीय मंत्र्यांमध्ये जोरदार नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही मंत्र्यांच्या नाराजीनाट्याचा अंक पाहायला मिळाला. तेलंगणा भाजपाने नवे प्रदेशाध्यक्ष नेमल्यानंतर केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी नाराज झाल्याचे वृत्त आहे. मंत्रीपदावरुन वगळले जाण्याच्या शक्यतेमुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, केवळ तेलंगणाच नव्हे तर सोबतच पंजाब, झारखंड आणि इतरही काही राज्यांमध्ये भाजप संघटनात्मक फेरबदल करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. यामध्ये आगामी लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊन अनेक केंद्रीय मंत्र्यांवर पक्षसंघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरुन कमी करत थेट पक्षसंघटनेत पाठवले जाऊ शकते. (हेही वाचा, Devendra Fadnavis Latest Interview: उद्धव ठाकरे यांच्याकडून धोका, तर शरद पवार यांचा 'डबल गेम', देवेंद्र फडणवीस यांची टीका (Watch Video))
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व संघटना महासचिव बी. एल. संतोष यांनी केंद्रीय मंत्री किरेन रीरिजू, अर्जुनसिंह मेघवाल, गजेंद्रसिंह शेखावत, एस. पी. सिंह बघेल यांनी सविस्तर चर्चा केली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतरही काही महत्त्वाच्या मंत्र्यांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केली. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यातील चर्चेमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहेत.
दरम्यान, बदलती राजकीय परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात नव्याने सोबत आलेला अजित पवार गट, आगोदरच सत्तेत असलेला शिंदे गट, उत्तर प्रदेशमध्ये ओमप्रकाश राजभर यांचा सुहेलदेव भारतीय समाज पक्ष, जीतन मांझी यांचा हुंदुस्तान आवाम मोर्चा, कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष), पंजाबचा शिरोमणी अकाली दल या पक्षांनाही भाजपला सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे. परिणामी भाजप आणि केंद्रीय नेतृत्वाला मंत्रिमंडळ विस्तार केल्याशिवया पर्याय नाही. हा पर्याय स्वीकारायचा तर नाराजी नाट्याला समोरे तर जावे लागणारच.