Mann ki Baat: कोविड-19 लस घेण्यास संकोच करु नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
प्रत्येकाने कोरोना लस लवकरात लवकर घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात' (Mann ki Baat) कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले. तसंच काही नवीन गोष्टींबाबत जनतेला माहिती दिली. विशेष म्हणेज कोरोना लसींचे महत्त्व त्यांनी या माध्यमातून नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. "कोविड-19 लसीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. लस घेण्यास संकोच करु नका," असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
मोदी म्हणाले की, विज्ञान आणि आपल्या वैज्ञानिकांवर विश्वास ठेवा. अजूनपर्यंत करोडो लोकांनी कोरोना विरुद्धची लस घेतली आहे. त्यामुळे या लसीसंबंधी पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्यांना या लसींबद्दल अफवा पसरवायच्या आहेत. त्यांना त्या पसवू दे. परंतु, आपण आपले काम करत सर्वांना लसीबद्दल जागरुक करत राहू. अजूनही देशात कोरोनाचे संकट तितकेच गंभीर असल्यामुळे लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यास संकोच करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
"मी स्वत: कोविड लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. माझी आई जवळपास 100 वर्षांची असून तिने देखील लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत," असेही त्यांनी आर्वजून सांगितले. (Covid-19 Vaccination in India: डिसेंबर 2021 पर्यंत देशातील सर्व प्रौढांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न- केंद्र सरकार)
मन की बात मधील इतर महत्त्वाचे मुद्दे:
# TOKYO Olympic 2020 साठी जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूने प्रचंड मेहनत घेतली असून ते अनेकांची मनं जिंकणार आहेत. आपण त्यांना पाठिंबा दर्शवून त्यांचे मनोबल वाढवण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले. तसंच साताऱ्यातील तिरंदाज प्रविण जाधव पहिल्यांदा ऑल्मपिकमध्ये सहभागी होणार आहे. मन की बात मध्ये मोदींनी त्याचाही उल्लेख केला.
# भारतीय महिला हॉकी टीमची सदस्य नेहा गोयल हिच्या खडतर प्रवासाविषयीही त्यांनी सांगितले.
# ऑल्मपिकबद्दल बोलताना नरेंद्र सिंह यांनी मिल्खा सिंह यांचाही उल्लेख केला. मी मिल्खा सिंह यांना ऑल्मपिकसाठी जाणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्याची विनंती केली होती, असे ते म्हणाले.
दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणासंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.