Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार, बेछूट गोळीबारात 13 जणांचा मृत्यू
यामुळे सुमारे 182 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हजार लोकांना घरे सोडावी लागली आहेत.
मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील लीथू गावात सोमवारी सकाळी 10:30 वाजता दोन गटांमध्ये गोळीबार झाला, ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आसाम रायफल्सच्या म्हणण्यानुसार, या भागात वर्चस्व असलेल्या एका बंडखोर गटाने हा हल्ला केला. घटनास्थळावरून आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना म्यानमारशी आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या कुकी बहुल भागात घडली. मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मे पासून हिंसाचार सुरू आहे. यामुळे सुमारे 182 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हजार लोकांना घरे सोडावी लागली आहेत. ते अनेक महिन्यांपासून मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. (हेही वाचा - UP Hit and Run Video: लखनऊमध्ये चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारने वाहतूक पोलिसाला चिरडले; घटना CCTV मध्ये कैद, आरोपीला अटक (Watch))
मणिपूर सरकारने काल (3 डिसेंबर) काही भाग वगळता संपूर्ण राज्यात 18 डिसेंबरपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. राज्य सरकारने म्हटले होते - कायदा आणि सुव्यवस्थेत झालेली सुधारणा आणि मोबाईल इंटरनेट बंदीमुळे लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चंदेल आणि कक्चिंग, चुराचंदपूर आणि बिष्णुपूर, चुराचंदपूर आणि काकचिंग, कांगपोकपी आणि इंफाळ पश्चिम, कांगपोकपी आणि इम्फाळ पूर्व, कांगपोकपी आणि थौबल आणि तेंगनौपाल आणि कक्चिंग जिल्ह्यांदरम्यान 2 किमीच्या भागात ही बंदी लागू असेल. राज्यात हिंसाचार भडकल्यानंतर मोबाईल इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती.