Maharashtra Weather Update 27 मे: विदर्भात उष्णतेची लाट, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता
27 मे रोजी महाराष्ट्रातील हवामानात मोठी विविधता पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा जारी केला आहे, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
महाराष्ट्रात मे महिन्याच्या शेवटी हवामानाचे दोन वेगळे रंग पाहायला मिळत आहेत. आज, २७ मे २०२६ रोजी भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे, तर दुसरीकडे विदर्भामध्ये सूर्याचा प्रकोश कायम आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खूप वर गेला असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ विभाग: तीव्र उष्णतेची लाट आणि रेड अलर्ट
विदर्भामध्ये सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने या संपूर्ण क्षेत्रासाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा (Severe Heatwave) इशारा देत 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
या भागातील कमाल तापमान ४5 ते ४७ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे. ब्रह्मपुरी आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्ये उष्णतेचा त्रास सर्वाधिक जाणवत असून कोरड्या हवामानामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
कोकण आणि गोवा विभाग: दमट हवामान आणि मान्सूनपूर्व सरी
मुंबई हवामान- कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसराचा विचार केल्यास या भागात सध्या प्रचंड उकाडा आणि दमट हवामान (Hot and Humid Weather) जाणवत आहे. मुंबईत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असले, तरी आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारे तापमान (Feels Like Temperature) अधिक आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २७ मे रोजी कोकण आणि गोव्याच्या काही भागात मेघगर्जनेसह आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही आज हवामानात बदल पाहायला मिळतील. , ठाणे आणि नाशिकच्या काही भागांत दुपारनंतर किंवा संध्याकाळी आकाश ढगाळ राहून विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या ढगांमुळे हलक्या सरी कोसळू शकतात, ज्यामुळे उकाड्यापासून किंचित दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
उद्याचे हवामान (28 मे )
उद्या, 28 मे रोजी देखील राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील तीव्र उष्णतेची लाट आणि 'रेड अलर्ट' उद्याही कायम असेल, ज्यामुळे तेथील तापमानात घट होण्याची सध्यातरी चिन्हे नाहीत. दुसरीकडे, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २८ मे रोजी देखील मान्सूनपूर्व पावसाच्या सरी आणि वादळी वाऱ्याचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 27, 2026 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

