मॅगी रिटर्न स्कीम: रिकामं पाकिट देऊन घ्या भरलेलं पाकिट अगदी मोफत
नेस्ले इंडियाने ग्राहकांसाठी एक खास स्कीम सुरु केली आहे.
तुमची आमची आवडती मॅगी आता अगदी मोफत मिळणार आहे. नेस्ले इंडियाने ग्राहकांसाठी एक खास स्कीम सुरु केली आहे. 'रिटर्न स्कीम' असे या स्कीमचे नाव आहे.
या स्कीमअंतर्गत तुम्हाला एक मॅगीचं भरलेलं पाकिट अगदी मोफत मिळणार आहे. पण कसं? तर त्यासाठी तुम्हाला एक सोपं काम करायचं आहे. ते म्हणजे मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत करायची आहेत. त्याबदल्यात तो तुम्हाला मॅगीचं एक भरलेलं पाकिट अगदी मोफत देणार आहे. सध्या ही स्कीम फक्त देहराडून आणि मसूरी या भागात सुरु करण्यात आली आहे. मात्र लवकरच या स्कीमचा विस्तार वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. देहराडून, मसूरी येथे कंपनीचे सुमारे 250 रिलेटर्स आहेत. या सर्व रिटेलर्सकडून ही ऑफर सुरु करण्यात आली आहे.
प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नेस्लेने हे पाऊल उचलले आहे. याचा फायदा नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी होईलच. पण त्याचबरोबर व्यापाऱ्यांनाही होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. मॅगीच्या रिकाम्या पाकिटांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आता 'इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन' ची असणार आहे.