Lucknow Shocker: बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारण्यासाठी 15 वर्षांच्या मुलीने आईला 3 महिने दिल्या झोपेच्या गोळ्या; लखनऊमधील धक्कादायक प्रकार

आईला गाढ झोप लागावी म्हणून ती दररोज तीन ते चार गोळ्या खाण्यापिण्यात मिसळून आईला देत होती.

Sleeping Pills | Representative Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow) येथून एका 15 वर्षांच्या मुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून आईला झोपेच्या गोळ्या (Sleeping Pills) देत होती. आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर मुलगी रात्री तिच्या प्रियकराशी तासनतास बोलत असे. त्याचबरोबर कधी-कधी मुलगी तिच्या आईला खोलीत बंद करून प्रियकरासोबत फिरायला निघून जायची. सतत झोपेच्या गोळ्या दिल्याने आईची तब्येत बिघडली, त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

अहवालानुसार, लखनौच्या कृष्णनगरमध्ये राहणारी 15 वर्षांची मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून सतत तिच्या आईला झोपेच्या गोळ्या देत होती. आईला गाढ झोप लागावी म्हणून ती दररोज तीन ते चार गोळ्या खाण्यापिण्यात मिसळून आईला देत होती. झोपेच्या गोळ्या सतत घेतल्याने एके दिवशी आईची तब्येत अचानक बिघडली. यानंतर आई डॉक्टरांकडे गेली. जेव्हा आईची चाचणी झाली तेव्हा तिला समजले की, तिला गेल्या काही महिन्यांपासून झोपेच्या गोळ्यांचा जास्त डोस दिला जात आहे.

घरी आल्यानंतर घरच्यांनी मुलीकडे कसून चौकशी केली असता तिने झोपेच्या गोळ्या दिल्याची कबुली दिली. झोपेच्या गोळ्यांसोबतच कुटुंबाला मुलीकडून विषाची बाटलीही सापडली. या दोन्ही गोष्टी तिला तिच्या मैत्रिणीने दिल्याचे मुलीने सांगितले. मुलगी शाळेतून येताना रोज तिच्या प्रियकराशी बोलायची. एके दिवशी आईने मुलीला पकडून तिच्याकडून मोबाईल काढून घेतला. यानंतर मुलीने प्रियकराच्या मदतीने योजना आखून, आईलां झोपेच्या गोळ्या देण्यास सुरुवात केली. (हेही वाचा: Uttar Pradesh: शाळेत शिक्षक पाहत होता अश्लील व्हिडीओ, विद्यार्थ्याने पकडताच केली बेदम मारहाण)

आईला गाढ झोप लागावी म्हणून, मुलीने तिच्या प्रियकराकडून झोपेच्या गोळ्या मागवल्या होत्या. ही मुलगी रोज झोपेच्या गोळ्या आईला जेवणात मिसळून देत होती. गोळ्या दिल्यानंतर आई झोपायची. यानंतर मुलगी रोज तिच्या प्रियकराशी तासनतास बोलत असे. ही बाब उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी मुलीचे समुपदेशन करून तिला निवारागृहात पाठवले.