Love Marriage: आता पेम विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार पोलीस संरक्षण व मदत; 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

प्रेम विवाह करणारी जोडपी कोणतीही मदत आणि संरक्षणासाठी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात.

Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

स्वत:च्या इच्छेने लग्न करणाऱ्या प्रौढ प्रेमी युगुलांच्या (Couples) सुरक्षेसाठी राजस्थान (Rajasthan) पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. आता अशा जोडप्यांना यापुढे काळजी करण्याची किंवा कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण आता कोणत्याही संकटाच्या वेळी पोलीस अशा जोडप्यांना संरक्षण देतील तसेच मदत करतील. राजस्थान पोलिसांनी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत आणि त्यांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक केले आहेत.

उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी राज्य स्तरावर अनुक्रमे नोडल अधिकारी आणि सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत, तर जिल्ह्यांमध्ये उप पोलीस अधीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक स्मिता श्रीवास्तव यांनी सांगितले की, राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून या संदर्भात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेम विवाह करणारी जोडपी कोणतीही मदत आणि संरक्षणासाठी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. राज्यस्तरीय नोडल अधिकारी श्वेता धनखर यांच्याशी ९४१३१७९२२८ या मोबाईल क्रमांकावर तर सहाय्यक नोडल अधिकारी वनिता शर्मा यांच्याशी ९४१४७०९५१४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

याआधी राजस्थान विधानसभेने ऑगस्ट 2019 मध्ये ऑनर किलिंगच्या विरोधात 'द राजस्थान प्रोहिबिशन ऑफ इंटरफेरन्सी ऑफ द फ्रीडम ऑफ मॅट्रिमोनिअल अलायन्सेस इन नेम ऑफ ऑनर अँड ट्रॅडिशन बिल' मंजूर केले, परंतु भारताच्या राष्ट्रपतींच्या मंजुरीची वाट पाहत असल्याने त्याबाबत अजून कायदा होऊ शकला नाही. (हेही वाचा: 'पाश्चिमात्य संस्कृतीला बळी पडून मुक्त नातेसंबंधाच्या आमिषाने देशातील तरुण आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत'- Allahabad High Court)

दरम्यान, राजस्थानमध्ये दर महिन्याला सरासरी 3000 विवाहांमध्ये एक विवाह असा समोर येतो, ज्यामध्ये मुलगा आणि मुलीने पळून जाऊन लग्न केले आहे. मात्र अनेकदा घरातील सदस्य त्यांचा माग काढतात आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यावरून मुलीला मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले जाते. मात्र, आता राजस्थानमधील प्रेमी युगलांचे वैवाहिक आयुष्य बऱ्यापैकी सुखकर होणार आहे.