Lok Sabha Security Breach: लोकसभा सभागृहात सुरक्षा भंग, Smoke Attack करत कामकाजात अडथळा; चौघांना अटक

या दोन व्यक्तींनी सोबत आणलेल्या वस्तूतून पिवळा धूर सोडत (Parliament Smoke Attack) आंदोलन करण्यास सुरुवात केली. या व्यक्तींच्या वर्तनाला हल्ला म्हणूनही गणले जात आहे.

Lok Sabha Security Breach | | (Photo Credit: ANI/X)

Parliament Security Breach: भारतीय संसदेमध्ये सुरक्षा भंग झाल्याची घटना घडली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नव्या संसद भवनात शन्यू प्रहर सुरु असताना दोन व्यक्तींनी अभ्यागतांच्या गॅलरीतून सभागृहात उडी घेतली. या दोन व्यक्तींनी सोबत आणलेल्या वस्तूतून पिवळा धूर सोडत (Parliament Smoke Attack) आंदोलन करण्यास सुरुवात केली. या व्यक्तींच्या वर्तनाला हल्ला म्हणूनही गणले जात आहे. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे मुंगीलाही शिरण्याची संधी नाही इतकी कडक सुरक्षा असूनही हा प्रसंग घडला. त्यामुळे केंद्र सरकारवर आणि संसदेला सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणांवर टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकसभेतील घटेचा व्हिडिओ व्हायरल

सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळते की, एक गडद निळ्या रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती कॅमेऱ्याच्या नजरेतून सूटण्यासाठी डेस्कवरुन उडी मारत होता. तर दुसरा व्यक्ती अभ्यांगतांच्या गॅलरीत धूर पसरवत होता. दोन्ही व्यक्तींना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघांकडेही कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, तपशील अद्याप पुढे येऊ शकला नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिज्युअल्समध्ये पाहायला मिळते की, लोकसभेच्या अध्यक्षांनी गोंधळ सुरू होण्याच्या काही सेकंद आधी सभागृहाचे कामकाज सुरु केले. नियमानुसार कामकाजाचे वाचन केले. दरम्यान, अचानकच "त्याला पकडा, त्याला पकडा" असा आरडाओरडा ऐकू येऊ लागतो. उपस्थित खासदारही गोंधळलेले दिसतात. (हेही वाचा, Parliament Winter Session 2023: लोकसभेच्या सुरक्षेत मोठी कुचराई; व्हिजिटर गॅलरीतून अज्ञात व्यक्तीचा सदनात प्रवेश)

आरोपींचा भाजप खासदाराच्या पासवर सभागृहात प्रवेश

धक्कादायक म्हणजे सांगितले जात आहे की, लोकसभा सभागृहात पोहोचण्यापूर्वी पाच वेळा तपासणी केली जाते. पाच वेळा तपासणी झाल्यानंतरच सभागृहात पोहोचता येते. या बहाद्दरांनी पाच वेळा होणाऱ्या तपासणीचे कवच भेदून सभागृहात प्रवेश केला. प्राथमिक माहिती अशी की, भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयाने दिलेल्या पासवर त्यांना प्रवेश देण्यात आला.

व्हिडिओ

 काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची प्रतिक्रिया

घडल्या प्रकाराबद्दल बोलताना काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सुरुवातीला कोणीतरी अभ्यागतांच्या गॅलरीतून खाली पडले असावे असे वाटले. पण, त्यापाठोपाठ दुसऱ्या व्यक्तीनेही सभागृहात उडी मारल्याने लगेचच लक्षात आले की, हा सुरक्षेचा भंग झाला आहे. आणि कोणीतरी बाहेरील व्यक्ती सभागृहात आली आहे. ज्याचा कामकाज अथवा संसदेशी कोणताही संबंध नाही.

व्हिडिओ

संसदेबाहेरुनही आणखी दोघे ताब्यात

दरम्यान, संसदेबाहेरुनही आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. सभागृहातील दोघांप्रमाणेच हे दोघे संसदेबाहेर धूर पसरवत होते. त्यांनी त्यांच्या हातातील विशिष्ट वस्तू फोडली आणि त्यातून लाल, पिवळा धूर पसरवला. जुन्या संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत आधीच गंभीर प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, ही घटना घडली. विशेष म्हणजे, काही तासांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद झालेल्या नऊ जवानांना श्रद्धांजली वाहिली होती.