नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार' प्रचार मोहीमेकडे 3.20 लाख बँक कर्मचाऱ्यांनी फिरवली पाठ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारासाठी 'मैं भी चौकीदार' म्हणत नवी प्रचारमोहीम हाती घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणूक 2019 च्या प्रचारासाठी 'मैं भी चौकीदार' म्हणत नवी प्रचारमोहीम हाती घेतली आहे. या प्रचार मोहीमेत डॉक्टर, वकील, शिक्षक, बँक आणि आयटी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन मोदींनी केलं आहे. मात्र या प्रचार मोहीमेकडे सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आपली असमर्थता त्यांनी चक्क पत्राद्वारे मोदींना कळवली आहे. देशातील सरकारी बँक अधिकऱ्यांची सर्वात मोठी संघटना 'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन' ने हा निर्णय घेतला आहे. आमचे प्रश्न सुटेपर्यंत आम्ही या मोहीमेत सहभागी होणार नसल्याचा पवित्रा बँक संघटनेने घेतला आहे. या संघटनेचे 3 लाख 20 हजार अधिकारी सदस्य आहेत.
'मैं भी चौकीदार' मोहीमेला असमर्थता दर्शवणारे पत्र 'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'नं मोदींना लिहिलं असून त्यात त्यांनी सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आमच्याकडून चौकीदार मोहीमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका, असे म्हणण्यात आले आहे. आता फेसबुकवरही 'मैं भी चौकीदार'ची लाट; अमित शहा यांनी प्रोफाईल फोटो बदलत केली सुरुवात
तसंच बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्याही पत्रात मांडल्या आहेत. यामध्ये बँकांचं विलिनीकरण, कर्मचारी भरती यांच्यासह अनेक समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या पत्राची प्रत आर्थिक सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशनलाही (आयबीए) पाठवण्यात आली आहे.