धक्कादायक! लॉक डाऊनमुळे Child Porn ची मागणी वाढली; Pornhub वर भारतातील ट्राफिकमध्ये 95 टक्क्यांनी वाढ, अभ्यासातून खुलासा
लोक घरात आहेत, अशात सर्व कुटुंब एकत्र आहे म्हणून आनंद आहे, मात्र दुसरीकडे स्त्रियांवरील, लहान मुलांवरील अत्याचारही वाढले आहेत
सध्या देशात कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. लोक घरात आहेत, अशात सर्व कुटुंब एकत्र आहे म्हणून आनंद आहे, मात्र दुसरीकडे स्त्रियांवरील, लहान मुलांवरील अत्याचारही वाढले आहेत. त्यात आता लहान मुलांच्या पॉर्न व्हिडिओजची (Child Pornographic Material व Child Sexual Abuse Material) मागणी वाढत असल्याचे भारतीय बाल संरक्षण निधीने (ICPF) सोमवारी सांगितले. आयसीपीएफने म्हटले आहे की, लॉक डाउनमुळे ऑनलाइन डेटा मॉनिटरिंग वेबसाइट्समध्ये चाइल्ड पॉर्न, सेक्सी मुले, टीन सेक्स व्हिडिओंसारख्या सर्चची मागणी वाढत आहे.
आयसीपीएफने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठी पॉर्नोग्राफी वेबसाइट पॉर्नहबच्या (Pornhub) आकडेवारीनुसार, 24 मार्च ते 26 मार्च दरम्यान भारतातून या वेबसाईटवर ट्राफिक 95 टक्क्यांनी वाढले आहे. लॉक डाऊनच्या आधी इतके ट्राफिक नव्हते. आयसीपीएफने असा इशारा दिला आहे की, यावरून असे दिसून येते की लाखो पेडोफाइल्स, बाल बलात्कार करणारे आणि बाल अश्लीलता व्यसनाधीन लोक स्वतःच्या कामवासनेसाठी इंटरनेटचा आधार घेत आहेत. यामुळेच मुलांसाठी इंटरनेट अत्यंत असुरक्षित बनले चालले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मुलांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये तीव्र वाढ होऊ शकते.
आयसीपीएफने नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, भुवनेश्वर आणि इंदूर अशा भारतातील 100 शहरांमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी मागणी बाबतचे संशोधन केलेला, 'Child Sexual Abuse Material in India', या नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. डिसेंबर 2019 मध्ये सार्वजनिक वेबसाईट्सवर 100 शहरांमध्ये, चाईल्ड पॉर्नची मागणी महिन्याला सरासरी पाच दशलक्ष होती, जी आता खूपच वाढली आहे. (हेही वाचा: लॉक डाऊनमुळे लहान मुलांवरील अत्याचार वाढले; सरकारी हेल्पलाईनवर Child Abuse बाबत 92 हजारपेक्षा जास्त कॉल्स)
दरम्यान, लॉक डाऊनमुळे मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची धक्कादायक बाब समोर येत आहे. चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाईन क्रमांकावर गेल्या 11 दिवसांत लहान मुलांवरील अत्याचाराबाबत तब्बल 92,000 कॉल आले आहेत.