आश्चर्यम्! DFO कार्यालयाने जारी केलेले पत्र- 'साईबाबांचा हा संदेश 13 लोकांना फॉरवर्ड करा आणि मिळावा प्रमोशन'; शासकीय वर्तुळात खळबळ
हे पत्र प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा आणि उपहासाचा विषय बनला आहे. या पत्रात अंधश्रद्धेला पाठींबा देणारा संदेश होता आणि हे पत्र न वाचताच डीएफओने त्यावर सही केली
कागदावरील मजकूर पाहिल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय त्यावर सही करणे किती घातक ठरू शकते याचे एक उदाहरण घडले आहे. ही घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील दतिया (Datia) जिल्ह्यात घडली आहे. इथे जिल्हा वन अधिकारी (डीएफओ कार्यालय) यांच्याकडून सर्व एसडीओ आणि रेंजर्स यांना एक पत्र देण्यात आले होते. हे पत्र प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा आणि उपहासाचा विषय बनला आहे. या पत्रात अंधश्रद्धेला (Superstitions) पाठींबा देणारा संदेश होता आणि हे पत्र न वाचताच डीएफओने त्यावर सही केली.
22 ऑगस्ट रोजी, डीएफओ कार्यालयात सीलबंद लिफाफ्यात एक पत्र आले. या पत्रात असे लिहिले होते की, 'हा एसएमएस सर्वांना पाठवा... एका आजारी महिलेने स्वप्नात पहिले की साई बाबा तिला पाणी पाजत आहेत. जेव्हा ती महिला सकाळी उठली, तेव्हा ती बरी झाली होती आणि तिच्याजवळ एक कपटा पडला होता, ज्यावर लिहिले होते Sai baba is the living God in the world. जेव्हा एका अधिकाऱ्याने काही लोकांना हा एसएमएस पाठविला तेव्हा त्याला पदोन्नती मिळाली. जेव्हा एका व्यक्तीने हा मेसेज डिलीट केला तेव्हा 13 दिवसांत त्याने सर्व काही गमावले. त्यामुळे तुम्हीही हा एसएमएस 13 लोकांना पाठवा.’ (हेही वाचा: दीर्घकालीन आजारातून बरे होण्यासाठी व धनप्राप्तीसाठी दिला 9 वर्षांच्या मुलाचा नरबळी)
हे पत्र जेव्हा डीएफओ प्रियांशी राठोड यांच्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी ते न पाहताच त्यावर रिसीव्हिंग सही केली, यानंतर कार्यालयातील लिपीक बाळकृष्ण पांडे यांनीही हे पत्र न पाहता ते वन मंडळ अधिकाऱ्यांना, एसडीओ, रेंजर तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून दिले. डीएफओला जेव्हा त्यांची चूक लक्षात आली, तेव्हा 27 ऑगस्टला त्यांनी या सर्वांना आणखी एक पत्र पाठविले, ज्यामध्ये पूर्वी पाठविलेले पत्र रद्द करण्याचे निर्देश दिले होते.