Law for Population Control: भारतामध्ये लवकरच येणार लोकसंख्या नियंत्रण कायदा; मंत्री Prahlad Singh Patel यांची माहिती
छत्तीसगडमधील रायपूर येथे गरीब कल्याण संमेलनादरम्यान मंत्र्यांनी ही घोषणा केली
मागच्या वर्षी भारताच्या लोकसंख्येबाबत (India Population) एक अहवाल समोर आला होता ज्यामध्ये म्हटले होते की, लोकसंख्या अभ्यासाच्या चिनी तज्ज्ञांच्या मते, संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार भारत 2027 पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. आता केंद्र सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा (Law for Population Control) आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Union Minister Prahlad Singh Patel) यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत असली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर तो मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
एका जाहीर सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही केली होती. दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. ‘हम दो हमारे दो’ शी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.
आता केंद्र सरकार लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी मंगळवारी केला. छत्तीसगडमधील रायपूर येथे गरीब कल्याण संमेलनादरम्यान मंत्र्यांनी ही घोषणा केली. पत्रकारांनी त्यांना या कायद्याबाबत माहिती विचारली असता, केंद्रीय मंत्री म्हणाले– ‘लोकसंख्या नियंत्रण विधेयक लवकरच येईल. काळजी करू नका. (हेही वाचा: Prashant Kishore On Congress: हात जोडून प्रशांत किशोर म्हणाले, काँग्रेससोबत काम करणार नाही कारण...)
याआधी, असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचे आमदार इझहर असफी यांनी आपला पक्ष एआयएमआयएमच्या विचारसरणीपासून वेगळा निर्णय घेत, लोकसंख्या नियंत्रण कायद्याला पाठींबा दिला होता. यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली होती. किशनगंज जिल्ह्यातील कोचाधामन विधानसभेतील एआयएमआयएम पक्षाचे आमदार इझार असफी यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्याचे समर्थन केले आहे.