Lalji Tandon Passes Away: मध्य प्रदेश चे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
त्यांचे सुपुत्र आशुतोष टंडन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही दु:खद बातमी शेअर केली आहे.
मध्यप्रदेशचे (Madhya Pradesh) राज्यपाल लालजी टंडन (Lalji Tandon) यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे सुपुत्र आशुतोष टंडन (Ashutosh Tandon) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही दु:खद बातमी शेअर केली आहे. 'बाबुजी नही रहे' असं त्यांचं आज (21 जुलै) सकाळचं ट्वीट आहे. मागील महिन्याभरापासून लालजी टंडन यांची प्रकृती ढासळत होती. दरम्यान मागील काही दिवसांपासून भोपाळमध्ये खाजगी रूग्णालयात उपचार घेताना त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते.
मेदांता हॉस्पिटलमध्ये 11 जून दिवशी लालजी टंडन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुरूवातीला दाखल करण्यात आले होते. त्यावेळे मूत्रविसर्जनाशी निगडीत त्रास आणि ताप होता. त्यानंतर यकृत आणि युरिन इंफेक्शनचा त्रास असल्याचं समोर आलं होतं. मागील महिनाभराच्या कालखंडात त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र 16 जुलै पासून पुन्हा त्यांची तब्येत खलावत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर त्यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. मेदांता हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांची फुफ्फुसं, किडनी, लिव्हर अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हती.
लालजी टंडन यांच्या निधनाचं वृत्त
लालजी टंडन यांच्यावर लखनौ मध्ये आज संध्याकाळी 4.30 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. त्यापूर्वी अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान लालजी टंडन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अधिभार उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे काही दिवसांपूर्वी अतिरिक्त प्रभार म्हणून सोपवण्यात आला होता.