Karnataka Shocker: आईने आपल्या 6 वर्षाच्या मुलाला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले; दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह, जाणून घ्या धक्कादायक कारण
तिने अशा मुलाला जन्म का दिला? असे विचारात रवी सतत टोमणे मारत असे. कधीकधी तर तो 'मुलाला फेकून दे' असेही म्हणत असे.
Mother Throws Son in Crocodile-Infested Waters: कर्नाटकातील दांडेली येथे अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेच्या पतीसोबत झालेल्या वादाचे परिणाम तिच्या 6 वर्षाच्या निष्पाप मुलाला भोगावे लागले. या ठिकाणी पतीसोबत वाद झाल्यानंतर चिडलेल्या 26 वर्षीय महिलेने आपल्या 6 वर्षांच्या अपंग मुलाला मगरी असलेल्या नदीत फेकेल. दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेह सापडला. कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यात ही घटना घडली. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. अहवालानुसार, मुलगा अपंग असल्याने त्याबाबत पती-पत्नीमध्ये वरचेवर भांडण होत होते. मुलाला जन्मापासून बोलता येत नव्हते. या जोडप्याला आणखी एक मुलगा आहे.
माहितीनुसार, मुलाची आई- सावित्रीने सांगितले की, तिचे पती रवी कुमार याच्यासोबत त्यांच्या मोठ्या मुलाच्या अपंगत्वावरून अनेकदा भांडण होत असे. तिने अशा मुलाला जन्म का दिला? असे विचारात रवी सतत टोमणे मारत असे. कधीकधी तर तो 'मुलाला फेकून दे' असेही म्हणत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी याच मुद्द्यावरून सावित्रीचे पतीसोबत पुन्हा भांडण झाले, त्यामुळे तिने संतापून आपल्या मोठ्या मुलाला मगरींनी भरलेल्या नदीत फेकून दिले. या जागेला क्रोकोडाइल पार्क असेही म्हणतात. या ठिकाणी मोठ-मोठ्या मगरींचे वास्तव्य आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बचावकार्य सुरू केले होते, मात्र अंधारामुळे ऑपरेशन मागे घ्यावे लागले.
त्यानंतर रविवारी पुन्हा मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी दांडेली ग्रामीण पोलिसांनी मुलाचा अर्धा खाल्लेला मृतदेह आढळला. त्याच्या अंगावर गंभीर जखमा, चाव्याच्या खुणा होत्या आणि त्याचा एक हात गायब होता. यावरून मगरीने मुलाची शिकार केल्याचे दिसून येते. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवरही गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.