Kailasa At UN Meet: काल्पनिक देश कैलाशाचा प्रतिनिधींची संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला उपस्थिती; भारताकडून Nithyananda चा छळ होत असल्याचा दावा

मात्र, या 'राष्ट्राला' संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली आहे की नाही आणि तसे असल्यास नित्यानंद याला काल्पनिक देशाचा राजा घोषित करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली हे स्पष्ट झालेले नाही.

Swami Nithyananda (File Image)

बलात्काराचे आरोप असलेल्या नित्यानंदने (Nithyananda) आता भारतावर आपला छळ केल्याचा आरोप केला आहे. बलात्काराचा आरोपी आणि स्वयंभू गॉडमॅन नित्यानंद याने स्थापन केलेल्या काल्पनिक देश कैलाशाचा (Kailasa) प्रतिनिधी युएनच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नित्यानंदने भारताविरुद्ध विष ओकले आहे. कैलाशाच्या प्रतिनिधीने सांगितले की नित्यानंद हा हिंदू धर्मातील सर्वोच्च शिक्षक आहे आणि भारताकडून त्याचा छळ केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत नित्यानंदला सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नित्यानंदने स्थापन केलेल्या काल्पनिक देशाचे नाव 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास' आहे. नित्यानंद गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे. देशात अनेक आश्रम चालवणाऱ्या नित्यानंद याच्यावर लैंगिक शोषण आणि अत्याचाराचे आरोप आहेत. गुजरात पोलिसांनी नोव्हेंबर 2019 मध्ये, नित्यानंद भारतातून फरार झाल्याची नोंद केली होती. आश्रमातील बालकांचे अपहरण झाल्याच्या आरोपांची पोलीस चौकशी करत होते.

भारतामधून फरार झाल्यानंतर लगेचच नित्यानंदने एका अज्ञात ठिकाणी कैलास राष्ट्राची 'स्थापना' केल्याचा दावा केला. मात्र, या 'राष्ट्राला' संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली आहे की नाही आणि तसे असल्यास नित्यानंद याला काल्पनिक देशाचा राजा घोषित करण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली हे स्पष्ट झालेले नाही.

नुकतेच 22 फेब्रुवारी रोजी, विजयप्रिया नित्यानंद नावाच्या महिलेने आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांवरील 19 व्या संयुक्त राष्ट्र समितीच्या (CESR) बैठकीत 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास' चे प्रतिनिधित्व केले. युएन वेबसाइटवर अपलोड केलेल्या व्हिडिओनुसार, विजयप्रिया ही 'कैलासाची स्थायी राजदूत' आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) वर चर्चा करणार्‍या बैठकीत बोलताना विजयप्रियाने दावा केला की, त्यांच्या 'राष्ट्राचे' संस्थापक नित्यानंद याचा त्यांचा जन्मदेश म्हणजेच भारताने 'छळ' केला होता.

हिंदू धर्माचे पहिले सार्वभौम राज्य म्हणून कैलासाचे ब्रँडिंग करून विजयप्रिया म्हणाली की, हिंदू संस्कृतीचे प्रबोधन करण्यासाठी हिंदू धर्माचे सर्वोच्च पुजारी नित्यानंद परमशिवम याने कैलासाची स्थापना केली होती आणि त्याद्वारे आदिशैव आदिवासी कृषी जमातींसह हिंदू धर्माच्या 10,000 परंपरांचे पुनरुज्जीवन होत आहे. कैलाशाचे हिंदू धर्माचे पहिले सार्वभौम राज्य म्हणून वर्णन करून, विजयप्रिया हिने राष्ट्रीय समुदायाला नित्यानंद आणि कैलाशा येथील वीस लाख हिंदू लोकांचा छळ थांबविण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: Sukesh Chandrasekhar Viral Video: जेलवर छापा पडताच ढसाढसा रडू लागला सुकेश चंद्रशेखर; दीड लाखाच्या चप्पलसह सापडली 80 हजारांची जीन्स, पहा व्हिडिओ)

दरम्यान, नित्यानंद याच्यावर बलात्काराचा आरोप असून कर्नाटकच्या सत्र न्यायालयाने 2010 मध्ये त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तक्रारीच्या आधारे नित्यानंदला अटकही करण्यात आली आणि नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, 2020 मध्ये, नित्यानंद देशातून पळून गेल्याची याचिका दाखल केल्यानंतर जामीन रद्द करण्यात आला.