देशाला नवीन सरन्यायाधीश मिळणार, Justice Sanjiv Khanna घेणार शपथ; जाणून घ्या त्यांनी घेतलेले मोठे निर्णय
13 मे 2025 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
Justice Sanjiv Khanna: न्यायमूर्ती संजीव खन्ना आज भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत के शपथ ( Oath Ceremony)घेतील. न्यायमूर्ती खन्ना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची जागा घेतील. चंद्रचूड (D Y Chandrachud)यांचा कार्यकाळ रविवारी संपला. न्यायमूर्ती खन्ना 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी सांभाळत (Chief Justice of India Sanjiv Khanna)आहेत. कलम 370 रद्द करणे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देणे यासारख्या निर्णयांमध्येही त्यांचा सहभाग आहे.
सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा सुरू होईल. न्यायमूर्ती खन्ना हे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची जागा घेतील आणि ते सरन्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारतील. 13 मे 2025 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. (New Chief Justice: CJI DY चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची केली शिफारस)
महत्त्वाच्या निर्णयांचा भाग
न्यायमूर्ती खन्ना 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. निवडणूक रोख्यांसोबतच, कलम 370 रद्द करणे, ईव्हीएमचे पावित्र्य राखणे आणि अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देणे यासारख्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग होता.
न्यायमूर्ती खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी दिल्लीतील एका कुटुंबात झाला. त्यांचे वडील न्यायाधीश देव राज खन्ना दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एचआर खन्ना यांचेही पुतणे आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचे शिक्षण घेतले. ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे कार्यवाहक अध्यक्षही राहिले आहेत.
न्यायमूर्ती खन्ना 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये सामील झाले आणि सुरुवातीला तिसहजरी कॅम्पसमधील जिल्हा न्यायालयात आणि नंतर दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी सराव केला. आयकर विभागाचे वरिष्ठ स्थायी वकील म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले. 2004 मध्ये, त्यांची दिल्लीसाठी स्थायी वकील म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून अनेक फौजदारी खटले लढवले.
24 ऑक्टोबर रोजी नियुक्ती जाहीर झाली
माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी 16 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस केली होती. यानंतर, केंद्राने 24 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती खन्ना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. शुक्रवारी न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा सरन्यायाधीश म्हणून शेवटचा कामकाजाचा दिवस होता. यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, वकील आणि कर्मचाऱ्यांनी भव्य निरोप दिला. त्यांनी 2 वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाला.