Job Layoff: जगभरात मोठ्या प्रमाणावर नोकर कपात; 4 पैकी 1 भारतीयाला सतावत आहे नोकरी गमावण्याची भीती- Kantar Survey

गेल्या काही महिन्यात नोकरदारांमधील नोकरी जाण्याची भीतीही वाढली आहे.

Job Layoff (Photo Credits: Twitter)

जगभरातील मोठमोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची छाटणी सुरू आहे. या कंपन्या आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. अशात सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक 4 पैकी 1 भारतीय नोकरी गमावण्याच्या चिंतेत आहे. दुसरीकडे, 4 पैकी 3 भारतीय वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहेत. सुमारे निम्म्या लोकांचा असा विश्वास आहे की, 2023 मध्ये देशाची अर्थव्यवस्था वाढू शकते. मार्केटिंग डेटा आणि अॅनालिटिक्स फर्म कंटारच्या सर्वेक्षणात (Kantar survey) हा मोठा खुलासा झाला आहे.

फर्म कंटारने भारताच्या सामान्य अर्थसंकल्प सर्वेक्षण-2023 च्या दुसऱ्या आवृत्तीत काही खुलासे केले आहेत. सर्वेक्षणानुसार, 31 टक्के लोकांना वाटते की यावर्षी, 2023 मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता आहे. अजूनही जागतिक आर्थिक मंदी आणि कोविड-19 ची भीती लोकांना सतावत आहे. गेल्या काही महिन्यात नोकरदारांमधील नोकरी जाण्याची भीतीही वाढली आहे. श्रीमंत वर्गात हे प्रमाण 32 टक्के असून, पगारदार वर्गात ते 30 टक्के आहेत. तसेच 36 ते 55 वर्षे वयोगटात 30 टक्के लोकांना नोकरी जाण्याची भीती आहे. (हेही वाचा: दररोज 3000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत टेक कंपन्या; जानेवारीमध्ये 65 हजारांहून अधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या)

यामध्ये म्हटले आहे की, ग्राहक प्राप्तिकराच्या संदर्भात धोरणात्मक बदलांची घोषणा केली जाऊ शकते. यामध्ये आयकर सवलतीची मर्यादा सध्याच्या 2.5 लाख रुपयांवरून वाढवली जाऊ शकते. सर्वेक्षणानुसार, व्यापक आर्थिक स्तरावर, बहुतेक लोकांची विचारसरणी अजूनही सकारात्मक आहे.

दरम्यान, नुकतेच गुगलने ते त्यांच्या 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे. आता टेकनंतर ऑटो क्षेत्रातील (Auto Sector) कंपन्याही मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या तयारीत आहेत. अमेरिकन कार निर्माता कंपनी फोर्ड मोटरने (Ford Motor Company) 3200 लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना तयार केली आहे.