Jharkhand Shocker: जंगलात केली लिव्ह-इन पार्टनरची हत्या; मृतदेहाचे 50 तुकडे करून जनावरांना खायला दिले, आरोपीला अटक

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी प्रियकराला पकडले.

Representational Image (Photo Credits: File Photo)

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड सारखीच एक घटना झारखंडमध्ये (Jharkhand) समोर आली आहे. येथे एका तरुणाने आधी आपल्या लिव्ह इन प्रेयसीचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेहाचे 40-50 तुकडे केले आणि प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात फेकून दिले. आरोपी प्रियकर नरेश भेंगरा याला अटक करण्यात आली आहे. जेव्हा एक भटका कुत्रा शरीराच्या काही भागांसह जरियागड पोलीस स्टेशनच्या जोरदग गावाजवळ दिसला, तेव्हा ही बाब खुनाच्या 15 दिवसांनंतर 24 नोव्हेंबर रोजी उजेडात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी प्रियकराला पकडले. पोलिसांच्या चौकशीत त्याने साथीदाराचा खून केल्याचे काबुल केले.

नरेश भेंगरा गेल्या काही वर्षांपासून खुंटी जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणीसोबत तामिळनाडूमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. काही काळापूर्वी आरोपी झारखंडला परतला आणि जोडीदाराला काहीही न सांगता त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केले. त्यानंतर पत्नीला झारखंडमध्ये सोडून तो तामिळनाडूत परत आला आणि प्रेयसीसोबत राहू लागला.

खुंटीचे एसपी अमन कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, ‘ही क्रूर घटना 8 नोव्हेंबर रोजी घडली. प्रेयसीने घरी जाण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र आरोपीने दुसरे लग्न केले असल्याने तो आपल्या प्रेयसीला घरी घेऊन जाऊ शकत नव्हता. त्याऐवजी तो तिला जवळच्या जंगलात घेऊन गेला. जरियागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या घरी जाऊन त्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. या प्रकरणाचा तपास करणारे इन्स्पेक्टर अशोक सिंह यांनी सांगितले की, हा व्यक्ती तामिळनाडूतील एका कसाईच्या दुकानात काम करत होता आणि चिकन कापण्यात तज्ञ होता. (हेही वाचा: Air India Pilot Srishti Tuli Death Case: एअर इंडिया पायलट सृष्टी तुली हिची आत्महत्या नव्हे हत्या झाली; कुटुंबीयांचा आरोप)

चौकशीमध्ये त्याने कबूल केले की, त्याने महिलेच्या शरीराचे 40 ते 50 तुकडे केले आणि नंतर ते वन्य प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात सोडले. 24 नोव्हेंबर रोजी या परिसरात एक कुत्रा शरीराच्या अवयवासह दिसल्यानंतर पोलिसांनी शरीराचे अनेक अवयव जप्त केले. मृतदेहाचे अवयव सापडल्यानंतर जंगलात एक पिशवीही सापडली होती, ज्यामध्ये या महिलेची माहिती होती. त्यांनतर महिलेच्या आईला घटनास्थळी बोलावण्यात आले आणि तिने गुन्ह्यामागे तिचा साथीदार असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली.