Jharkhand Floor Test: झारखंड विधानसभेत Champai Soren यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; बाजूने पडली 47 मते, तर 29 विरोधात
त्यांनी आज विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली.
Jharkhand Floor Test: झारखंडमध्ये (Jharkhand) हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या चंपाई सोरेन (Champai Soren) यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 47 मते पडली, तर विरोधात 29 मते पडली. अपक्ष आमदार सरयू राय यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. झारखंडमध्ये 81 जागा आहेत, कोणत्याही एका पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 41 आमदारांची गरज आहे. पक्ष आणि विरोधी पक्षाचे एकूण 77 आमदार सभागृहात उपस्थित होते. तर झामुमोचे रामदास सोरेन, भाजपचे इंद्रजीत महातो आणि अपक्ष अमित महतो अनुपस्थित होते.
चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारीला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यांनी आज विश्वासदर्शक ठराव मांडला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली. चंपाई सोरेन यांनी चर्चेला सुरुवात करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आम्ही त्यांना अपयशी ठरवले.. हेमंत सोरेन यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी भाजप केंद्रीय एजन्सीचा वापर करत आहे, असेही सोरेन म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘हेमंत सोरेन यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, मात्र त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या योजना आम्ही पुढे नेऊ.’ यानंतर हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकार, राज्यपाल आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान मी भाजपला देतो, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन. मी केवळ राजकारणातून निवृत्त होणार नाही, तर झारखंड सोडेन. मी अश्रू ढाळणार नाही आणि योग्य वेळ आल्यावर 'सरंजामी शक्तींना' चोख प्रत्युत्तर देऊ. केंद्राच्या कारस्थानानंतर माझ्या अटकेत राजभवनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.’ (हेही वाचा: Floor Test in Bihar: बिहारमध्ये 12 फेब्रुवारीला होणार बहुमत चाचणी! काँग्रेस आमदार पोहोचले हैदराबादला)
यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले की द्वेषाचा पराभव होईल. राहुल गांधी आणि कल्पना सोरेन यांचा फोटो शेअर करताना काँग्रेसने लिहिले की, ‘आज कल्पना सोरेन यांनी झारखंडमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली. आपण सर्व संघटित होऊन न्यायाचा लढा सुरू ठेवू आणि जनतेचा आवाज बुलंद करू. द्वेष हरेल, इंडिया जिंकेल.’