10 ऑक्टोबरपासून काश्मीर पर्यटकांसाठी खुले; राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मोठा निर्णय, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा
या निर्णयाचे पडसाद भारतासह, पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले. त्यानंतर जो हिंसाचार उमटला त्यातून आता कुठे काश्मीर सावरत आहे.
मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) कलम 370 (Article 370) रद्द केले. या निर्णयाचे पडसाद भारतासह, पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटले. त्यानंतर जो हिंसाचार उमटला त्यातून आता कुठे काश्मीर सावरत आहे. या दरम्यान केंद्र सरकारने काश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती, इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. आता येत्या 10 ऑक्टोबरपासून काश्मीर पर्यटकांसाठी खुले होणार आहे. म्हणजेच कलम 370 रद्द केल्यावर पहिल्यांदाच काश्मीरला पर्यटक भेट देऊ शकणार आहेत.
2 ऑगस्ट रोजी गृह विभागाने एक आदेश जारी करत जम्मू-काश्मीरमधून अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठविले होते. आता मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी हा आदेश मागे घेतला आहे. गेले दोन महिने काश्मीर पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते, त्यानंतर येत्या गुरुवारपासून ते खुले होणार आहे. बैठकीतील सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेताना सांगण्यात आले की, गेल्या सहा आठवड्यांत काश्मीरमधील बर्याच भागातून निर्बंध हटविण्यात आले आहेत. उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे सुरू झाले आहेत. सार्वजनिक वाहनेही सुरू केली आहेत. तसेच लोकांच्या सोयीसाठी जिल्ह्यात 25 इंटरनेट कियॉस्क सुरू करण्यात आले आहेत. (हेही वाचा: जम्मू-काश्मीर: अमरनाथ यात्रा स्थगित; सुरक्षेच्या कारणास्तव भाविक, पर्यटकांना तात्काळ काश्मीर सोडण्याच्या सूचना)
जम्मू-काश्मीरमध्ये ब्लॉक विकास बोर्डाच्या निवडणुका घेण्याची घोषणा गेल्याच आठवड्यात करण्यात आली होती. या बैठकीत बीडीसी निवडणुकीच्या मुद्दय़ावरही चर्चा झाली. या निवडणुकांबाबत लोकांमध्ये उत्साह आहे, असा दावा केला गेला. आढावा घेताना असे सांगितले गेले की, पक्षाला तुरूंगात नेलेल्या नेत्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. या सभेला सल्लागारांव्यतिरिक्त मुख्य सचिवही उपस्थित होते.