J& K Terror Attack: जम्मू कश्मीर मध्ये कुलगाम भागात शिक्षिका ठरली दहशतवाद्यांचं लक्ष्य

आज (31 मे) कुलगाम परिसरामध्ये एक महिला शिक्षिकेला ठार मारल्याची घटना समोर आली आहे.

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जम्मू कश्मीर मध्ये सामान्य नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्याचा प्रकार अजूनही सुरू आहे. आज (31 मे) कुलगाम परिसरामध्ये एक महिला शिक्षिकेला ठार मारल्याची घटना समोर आली आहे. जम्मू कश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, कुलगाम मधील गोपालपोरा भागामध्ये एका हायस्कूल मध्ये हा प्रकार घडला आहे. जखमी अवस्थेमध्ये त्या शिक्षिकेला रूग्णालयात नेण्यात आले पण तिला वाचवण्यात यश आले नाही. या शिक्षिकेचं नाव रजनी भल्ला असून त्या 36 वर्षीय आहेत.

दहशतवाद्यांचं लक्ष्य ठरलेली शिक्षिका जम्मुच्या सांबा भागातील रहिवासी होती. तिच्यावर हल्ला होताच पोलिसांनी तो भाग कॉर्डन ऑफ केला आहे. दरम्यान ही शिक्षिका जम्मूमधील हिंदू होती. कश्मीर झोन पोलिसांनी या प्रकरणामध्ये असलेल्या दहशतवाद्याला ओळखून, शोधून नेस्तनाबूत केलं जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या कश्मीरचं खोरं पुन्हा पुन्हा अशा हत्याकांडांनी हादरत आहे. 12 मे दिवशी दहशतवाद्यांनी राहुल भटची हत्या केली होती. सरकारी कर्मचारी असलेल्या राहुल भटला दिवसा ढवळ्या कार्यालयात गोळ्या घालण्यात आल्या होत्या. मागील आठवड्यात बडगाम च्या चदूरा मध्ये लष्कर ए तैयबा च्या दहशतवाद्यांनी टीव्ही कलाकार अमरीन भट ची हत्या केली आहे. हे देखील नक्की वाचा: 'The Kashmir Files' वर बंदी घालण्याची जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री Farooq Abdullah यांची मागणी.

सध्या शाळेच्या परिसरामध्ये आर्मी पोलिस तैनात करण्यात आले आहे. शिक्षिकेच्या नातेवाईकांकडून सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने कडक पावलं उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सच्या उमर अब्दुला यांनी या हत्यांचा निषेध केला आहे. अलीकडील चकमकींमध्ये, सुरक्षा दलांनी वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत लष्कर-ए-तैयबा  आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांशी संबंधित 26 परदेशी दहशतवाद्यांना ठार केले आहे, असे काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले.