फारूक अब्दुल्ला (Photo Credits-Twitter)

कश्मीरी पंडितांवर होणारे हल्ले सध्या पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (farooq abdullah)यांनी याचा संबंध कश्मीर फाईल्स सोबत जोडला आहे. फारूक अब्दुल्ला यांच्या मते जर काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील तर सरकारला कश्मीर फाईल्स सिनेमावर बंदी आणावी लागेल.

फारूक अब्दुल्ला यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित कश्मीर फाईल्स या सिनेमाला कोणताही आधार नाही तो फेक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अब्दुल्ला आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यासह पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशनच्या नेत्यांनी कश्मिरच्या खोऱ्यातील हिंसाचाराच्या अलीकडील वाढत्या घटनांबाबत चर्चा करण्यासाठी LG Manoj Sinha यांची भेट घेतली आहे. यानंतर अब्दुल्ला बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे. सध्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेला असून पर्यटक म्हणून येणार्‍यांनाही सध्या लक्ष्य केले जात आहे. नक्की वाचा: The Kashmir File: विकिपीडियाने विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाला काल्पनिक म्हटले, संतप्त दिग्दर्शकाने दिले चोख उत्तर .

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवार (15 मे) दिवशी दिलेल्या माहितीनुसार, खोऱ्यातील सरकारी काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या निवासी भागात सुरक्षा वाढवली जाईल, तसेच निषेधादरम्यान त्यांच्याविरुद्ध अश्रूधुराच्या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्याची घोषणा केली आहे.

गुरुवार, 12 मे दिवशी राहुल भट या काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या हत्येमुळे स्थानिकांनी रस्त्यावर निदर्शने केली आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. निषेधानंतर, जम्मू-काश्मीर सरकारने हत्येचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, रविवारी लष्कर-ए-इस्लामनेही धमकी दिली आहे,'काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर मरायला तयार व्हावे'. पोस्टरमध्ये लिहिले आहे, 'सर्व स्थलांतरित आणि आरएसएसचे एजंट निघून जा नाहीतर मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तयार राहा. काश्मीरला दुसरा इस्रायल हवा आहे आणि काश्मिरी मुस्लिमांना मारायचे आहे, अशा काश्मिरी पंडितांना इथे जागा नाही. तुमचा बचाव दुप्पट किंवा तिप्पट करा, टार्गेट किलिंगसाठी तयार रहा.'

पुलवामा येथील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना ही धमकी देण्यात आली आहे. या ट्रान्झिट निवासस्थानात राहणारे बहुतेक काश्मिरी पंडित सरकारी नोकरी करतात. हे पोस्टर हवाल ट्रान्झिट हाऊसिंगच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिले आहे.