जम्मू कश्मीर: बारामूला येथील सोपोर परिसरात सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा
सोपोर येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.
जम्मू-काश्मीर येथील बारामूला (Baramulla) येथे सोपोर (Sopore) परिसरात आज (22/2/2019) दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. तर अजून दोन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सोपोर येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु; 2-3 दहशतवाद्यांना घेरले
गुरुवारी (21/2/2019) सोपोर भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला उत्तर देत लष्करी जवानांनी गोळीबाराला सुरुवात केली. आज सकाळपासून ही चकमक सुरु होती. दरम्यान गावातून बाहेर जाण्याचे आणि प्रवेशाचे मार्ग बंद करण्यात आले असून सोपोर येथील इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात आली आहे.
14 फेब्रुवारीला जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं. तर हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला.