Jammu and Kashmir: PoK मधून नदीमार्फत हत्याऱ्यांची तस्करी करणाऱ्या दहशतावाद्यांचा कट भारतीय लष्कराने उधळला; मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा जप्त (Watch Video)
वृत्तसंस्था एएनआयला भारतीय सेना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन गंगा नदीच्या किनारी संशयास्पद हालचाली होत असल्याचे निर्दशनास आले.
पाकिस्तानचा (Pakistan) घुसखोरीचा प्रयत्न आज (शनिवार, 10 ऑक्टोबर) भारतीय सेनेने उधळून लावला. वृत्तसंस्था एएनआयला (ANI) भारतीय सेना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशन गंगा नदीच्या किनारी संशयास्पद हालचाली होत असल्याचे निर्दशनास आले. त्यानंतर जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) पोलिसांसह भारतीय लष्कराने संयुक्त अभियान सुरु केले आणि पाकिस्तानचा कट उधळून लावला. किशनगंगा नदीच्या रस्त्याने पाकव्याप्त (POK) काश्मीरमधून दहशतवादी हत्याऱ्यांची तस्करी करत होते. मात्र भारतीय सेनेच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाहीत. तसंच या अभियानात 4 एके 74 रायफल, 8 मॅगझीन, 240 एके रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. याचा एक व्हिडिओ देखील ANI ने शेअर केला आहे.
किशन गंगा नदीच्या किनारी संशयास्पद हालचाली निर्दशनास आल्यानंतर उत्तर काश्मीरच्या केरेन सेक्टर (Keren Sector) मध्ये तैनात सैनिकांनी दहशतवाद्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला. त्यात असे दिसून आले की, दोन किंवा तीन दहशतवादी नदीच्या काठावरुन दोरीने बांधलेल्या टयुबमधून काही वस्तू घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर लष्कराचे जवान आणि पोलिसांनी एकत्रित कारवाई करत मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला.
ANI Tweet:
लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी सांगितले की, 'यावर्षी मोठ्या प्रमाणात घुसखोरी रोखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. पाळत ठेवणारी उपकरणे वापरणारे जागरूक सैनिकांमुळे पाकिस्तानचा हेतू अपयशी ठरला. भविष्यातही आम्ही असेच सज्ज असू."
"आमच्या गुप्तचर यंत्रणांनुसार पाकिस्तानी सीमेवर लाँचपॅडवर सुमारे 250 ते 300 दहशतवादी आहेत. आम्ही त्यांचे प्रयत्न रोखण्यास यशस्वी झालो आहोत," असेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी सुमारे 130 लोक घुसखोरी करून दाखल झाले होते. यावर्षी ही संख्या 30 पेक्षा कमी आहे. घुसखोरी रोखण्यात आलेल्या यशामुळे अंतर्गत परिस्थितीतही सुधारणा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.