IPL Auction 2025 Live

IT Raid at Businessman Piyush Jain's Home: रोख 150 कोटी रुपयांचे घबाड, 8 यंत्रांद्वारे 24 तास नोटा मोजण्याचे काम सुरुच; कानपूर येथील परफ्यूम उद्योजकाच्या घरावर आयटीचा छापा

या कारवाईत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. रोख रक्कम स्वरुपात सापडलेला पैसा इतका आहे की, त्या पैशांची मोजणी अद्यापही सुरुच आहे.

Piyush Jain's Home | ( । PC: Twitter/ ANI)

कानपूर येथील अत्तर व्यवसायीक पीयूष जैन (Businessman Piyush Jain) यांच्या घरी आयकर विभागाने छापा (IT Raid at Businessman Piyush Jain's Home) मारला. या कारवाईत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. रोख रक्कम स्वरुपात सापडलेला पैसा इतका आहे की, त्या पैशांची मोजणी अद्यापही सुरुच आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल 150 कोटी रुपयांची रक्कम आणि त्यासोबत इतरही मालमत्ता हाती लागली आहे. पैसे मोजण्याच्या तब्बल 8 यंत्रांसह उर्वरीत रोख रकमेची मोजणी पाठीमागील 24 तासांपासून अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, उद्योगपती पीयूष जैन (Piyush Jain) यांचा मुलगा प्रत्युष जैन यांना घेऊन डीजीजीआयचे पथक चौकशीसाठी दुसऱ्या ठिकाणी गेले आहे.

जीएसटी इंटेलिजेन्स मारानिदेशालय म्हणजेच डीजीजीआय आणि आयकर विभागाच्या पथकाने कन्नौज येथील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरी छापा टाकला होता. या कारवाईत घरातील कपाटांमध्ये इतके पैसे मिळाले की ते पैसे मोजण्यासाठी तब्बल मशीन मागवावे लागले. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टमचे चेअरमन विवेक जौहरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच, नोटा मोजण्याचे काम अद्यापही सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. (हेही वाचा, Samajwadi Perfume: उत्तर प्रदेशच्या राजकारणात हटके फाया, अखिलेश यादव यांच्याकडून 'समाजवादी अत्तर' लॉन्च)

डीजीजीआय आणि आयकर विभागाने केलेल्या कारवाईला आतापर्यंत 24 तासांपेक्षाही अधिक काळ उलटून गेला आहे. अत्यापही घरामध्ये नोटा मोजण्याचे काम सुरुच आहे. गुरुवारी नोटा मोजण्यासाठी 6 यंत्रे मागविण्यात आली होती. मात्र, नोटांचे बंडल इतके होते की, यंत्रे कमी पडत आहेत. त्यानंतर आणखी दोन यंत्रे मागविण्यात आली. सध्या 8 यंत्रांच्या मदतीने डीजीजीआय विभागाचे अधिकारी नोटा मोजत आहेत, अद्यापही नोटा मोजण्याचे काम सुरुच आहे.

छापेमारीच्या काळात पीयूष जैन घराच्या बाहेर होते. आतापर्यंत नोटांनी भरलेले 6 मोठे बॉक्स मोजूनझाले आहेत. हे सर्व बॉक्स स्टीलचे आहेत. या बॉक्समध्ये भरुन या नोटा आयकर विभागचे अधिकारी पुढील कारवाईसाठी स्वत:सोबत घेऊन गेले आहेत. नोटा घेऊन जाण्यासाठी पीएसीलाही बोलाविण्यात आले आहे. छापेमारीची कारवाई अद्यापही सुरु आहे.