एक CT Scan हा छातीच्या 300-400 एक्स-रे बरोबरीचा? IRIA ने फेटाळून लावला एम्सचे Dr Randeep Guleria यांचा दावा

गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचणी व्यतिरिक्त रुग्ण सीटी स्कॅनही करत आहेत. त्यानंतर, बर्‍याच ठिकाणाहून तक्रारी मिळाल्या होत्या की, लॅब आणि रुग्णालये सीटी स्कॅनसाठी जास्त शुल्क आकारत आहेत. या पार्श्वभुमीवर एम्सचे संचालक म्हणाले होते की, कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना सीटी स्कॅनमुळे फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो

एक CT Scan हा छातीच्या 300-400 एक्स-रे बरोबरीचा? IRIA ने फेटाळून लावला एम्सचे Dr Randeep Guleria यांचा दावा
Dr Randeep Guleria, Director AIIMS (Photo Credits: ANI/Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सीटी स्कॅन (CT Scan) करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही बर्‍याचवेळा कोरोना अहवाल नकारात्मक आल्याने, डॉक्टर लोकांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देत आहेत. यावर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी कोरोनाची सौम्य लक्षणे असल्यास सीटी स्कॅन करण्याची गरज नाही, असे सांगितले होते. यासह सीटी स्कॅन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते व त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते असेही ते म्हणाले होते. आता इंडिअन रेडिओलॉजी अँड इमेजिंग असोसिएशनने (IRIA) गुलेरिया यांचा दावा फेटाळून लावला आहे.

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी स्वतःपुढे येऊन दावा केला होता की, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये सीटी स्कॅन धोकादायक असल्याचे सिद्ध होऊ शकते. तसेच एक सीटी स्कॅन हा 300 छातीच्या एक्स-रेच्या बरोबरीचा असू शकतो. आता याबाबत आयआरआयएने एक निवेदन दिले आहे ज्यामध्ये ते म्हणतात, ‘दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांचे विधान हे दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारे आहे. तसेच, सीटी स्कॅनबद्दल चेतावणी देताना त्यांनी जे सांगितले की, एक सीटी स्कॅन 300 पेक्षा जास्त क्ष-किरणांबरोबरीचा आहे, हा युक्तिवाद खूप जुना आणि चुकीचा आहे.’

आयआरआयएने म्हटले आहे की एका वरिष्ठ डॉक्टरांच्या अशा विधानामुळे ते आश्चर्यचकित आणि निराश झाले आहेत. आयआरआयएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कोरोनाची संसर्गाची तीव्रता शोधण्यासाठी सीटी स्कॅन करणे महत्वाचे आहे. यामुळे या रोगाचे प्रमाण समजून घेण्यास मदत होते. अनेकदा कोरोनाचा म्यूटेंट, कमी व्हायरल लोड आणि तांत्रिक त्रुटीमुळे रूग्णांची आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक येते अशावेळी सीटी स्कॅनची मदत होते. विशेषतः ज्यांची अवस्था गंभीर आहे अशा रुग्णांसाठी सीटी स्कॅन उपयुक्त आहे.’ (हेही वाचा: कोविड-19 ची सौम्य लक्षणे असताना CT Scan टाळा त्यामुळे कॅन्सरचा धोका- AIIMS Chief Randeep Guleria)

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून आरटी-पीसीआर चाचणी व्यतिरिक्त रुग्ण सीटी स्कॅनही करत आहेत. त्यानंतर, बर्‍याच ठिकाणाहून तक्रारी मिळाल्या होत्या की, लॅब आणि रुग्णालये सीटी स्कॅनसाठी जास्त शुल्क आकारत आहेत. या पार्श्वभुमीवर एम्सचे संचालक म्हणाले होते की, कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना सीटी स्कॅनमुळे फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो.

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2021 11:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).