उत्तर प्रदेश: कुख्यात विकास दुबे याला पकडण्यासाठी Intelligence Bureau यूपी पोलिसांच्या मदतीला

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने नाव न छापन्याच्या अटीवर म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमधील गुन्हेगार, राजकीय नेते आणि नोकरशाही यांच्यातील मधूरसंबंधाचा मोठा खुलासा झाला आहे.

Crime | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी आता देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था अशी ओळख असलेल्या इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) ची मदत घेणार आहेत. कानपूर येथे चकमकीत आठ पोलिसांचे प्राण घेणारा कुख्यात गुन्हेगार विकास दुबे (Vikas Dubey) याला पकडण्यासाठी यूपी पोलीस आता आयबी या संस्थेची मदत घेणार आहेत. इंटेलिजेंस ब्युरोचे अधिकारी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ची मदत करणार आहेत. जेणेकरुन कुख्यात विकास दुबे पकडला जाईल. विकास दुबे याच्यावर आतापर्यंत सुमारे अर्धशतकाहून अधिक (60) गुन्हे नोंद आहेत.

सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इंटेलिजेंस ब्युरो आणि स्पेशल टास्क फोर्स यांना संशय आहे की विकास दुबे हा चंबळ खोऱ्यात लपला असावा. त्यांनी दुबे याचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडे तपशील मागवला आहे. विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. तरीही त्याचा अद्याप पत्ता लागला नाही. विकास दुबे याचा ठावठिकाणा सांगण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस मोठे इनाम जाहीर करण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, मद्यधुंद पोलिसाने आपल्या गाडीने महिलेला दोन वेळा चिरडले? पोलिसांनी दिले 'हे' स्पष्टीकरण (Watch Video))

पोलीस तपासात पुढे आलेली बाब अशी की, विकास दुबे आणि उत्तर प्रदेशातील अनेक राजकीय नेते, तसेच कायदा अंमलबजावणी एजन्सी, उत्तर प्रदेश पोलीस दलातील काही अधिकारी, कर्मचारी यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने नाव न छापन्याच्या अटीवर म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमधील गुन्हेगार, राजकीय नेते आणि नोकरशाही यांच्यातील मधूरसंबंधाचा मोठा खुलासा झाला आहे.