कर्नाटक: कोप्पल येथील उद्योगपती श्रीनिवास गुप्ता यांचा पत्नीच्या मेणाच्या पुतळ्यासह नव्या घरात प्रवेश; पहा फोटोज

त्यांनी आपल्या नव्या घरात चक्क दिवंगत पत्नी माधवी यांच्या पुतळ्यासह प्रवेश केला आहे.

Industrialist Shrinivas Gupta with wife Madhavi’s Statue (Photo Credits: ANI)

कर्नाटक (Karnataka) येथील कोप्पल (Koppal) जिल्ह्यातील उद्योगपती श्रीनिवास गुप्ता (Shrinivas Gupta) हे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या नव्या घरात चक्क दिवंगत पत्नी माधवी (Madhavi) यांच्या पुतळ्यासह प्रवेश केला आहे. माधवी 2017 मध्ये आपल्या दोन मुलींसह तिरुपती यात्रेला गेल्या होत्या. यात्रेदरम्यान कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. आपला एक बंगला असावा अशी माधवी यांची इच्छा होती. त्यामुळे माधवी यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीनिवास गुप्ता यांनी नवं घर बांधलं. नवीन घरात पत्नीची कमतरता भासू नये आणि मरोत्तर का होईना माधवी यांना स्वप्नपूर्तीचा आनंद घेता यावा यासाठी श्रीनिवास यांनी पत्नीचा पुतळा तयार करुन घेतला. हा पुतळा मेणाचा आहे.

माधवी यांचा हा पुतळा आर्किटेक्ट रंगनान्नवर यांच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. हा पुतळा हुबेहुब तयार करण्यात आला असून गुलाबी रंगाच्या साडीत खुद्द माधवी आहेत, असेच भासते. या पुतळ्या शेजारी बसून श्रीनिवास गुप्ता यांचे फोटोज समोर आले आहेत.

ANI Tweet:

उद्योगपती श्रीनिवास गुप्ता 57 वर्षांचे आहेत. दिवंगत पत्नीच्या आठवणीत काहीतरी खास करण्याचा श्रीनिवास यांचा मानस होता. पुतळा तयार करण्यासाठी त्यांनी तब्बल 25 आर्किटेक्ट्सना संपर्क केला. मात्र रंगनान्नवर शिवाय कोणीही त्यांना मदत केली नाही.