IndiGo's Statement: 'कठीण काळात आम्ही सर्वोत्तम निर्णय घेतला'; अपंग मुलाला विमानात चढू न दिल्याबाबत इंडिगोने जारी केले निवेदन
विमान चढण्याआधी इंडिगोच्या कर्मचाऱ्याने मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
सध्या सोशल मिडीयावर विमान सेवा पुरवणारी एक लोकप्रिय कंपनी ‘इंडिगो’वर (IndiGo) कडाडून टीका होत आहे. इंडिगोने एका दिव्यांग मुलाला रांची विमानतळावर विमानात चढण्यापासून रोखले होते. हा मुलगा ‘घाबरला’ असल्याने त्याला विमान चढू दिले नसल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकारानंतर एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने प्रकरणाचा तपास सुरू केला असून एअरलाइनला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिका-यांनी सांगितले की, मुलाला शनिवारी एअरलाइन्सच्या रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आले असल्याने, त्याच्या पालकांनीही फ्लाइटमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला.
आता इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रोनोजॉय दत्ता यांनी सोमवारी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला हैदराबादला जाणाऱ्या विमानात बसू न दिल्याच्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. एका निवेदनात ते म्हणाले, ‘या घटनेच्या सर्व पैलूंचा आढावा घेतल्यानंतर, एक संस्था म्हणून आम्हाला विश्वास आहे की, आम्ही कठीण परिस्थितीत सर्वोत्तम निर्णय घेतला. 'चेक-इन' आणि 'बोर्डिंग' प्रक्रियेदरम्यान कुटुंबाला घेऊन जाण्याचा त्यांचा मानस होता, परंतु हा मुलगा प्रचंड घाबरला होता.’
ते पुढे म्हणाले, ‘आमच्या प्रवाशांना विनम्र आणि दयाळू सेवा प्रदान करणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या पालकांनी आपले जीवन आपल्या दिव्यांग मुलाच्या ळजीसाठी समर्पित केले ते आपल्या समाजाचे खरे हिरो आहेत हे आपल्याला चांगलेच माहीत आहे. परंतु घडलेल्या या दुःखद अनुभवाबद्दल आम्ही पीडित कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करतो आणि आम्ही त्यांच्या मुलासाठी 'इलेक्ट्रिक व्हीलचेअर' खरेदी करण्याची ऑफर देऊ इच्छितो.’ (हेही वाचा: कर्नाटकात 'लाऊडस्पीकरवर अजान'वरून वाद वाढला, ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाईचा इशारा)
दरम्यान, याआधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोमवारी या घटनेचा निषेध केला आणि सांगितले की ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विमान चढण्याआधी इंडिगोच्या कर्मचाऱ्याने मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर एअरलाइनने त्यांची एका हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या कुटुंबाने दुसरे विमान घेतले.