Coronavirus in India: भारतातील कोरोना बाधितांची संख्या 35 लाखांच्या पार; देशात एकूण 63,498 मृत्यू
मागील 24 तासांत त्यात 78,761 नव्या रुग्णांची भर पडली असून 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील दिवसागणित वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येने आज 35 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत त्यात 78,761 नव्या रुग्णांची भर पडली असून 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 35,42,734 वर पोहचला आहे. तर एकूण 63,498 मृतांची नोंद झाली आहे. सध्या देशात 7,65,302 सक्रीय रुग्णांवर (Active Cases) उपचार सुरु आहेत. तर 27,13,934 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे.
कोरोना बाधितांचा वाढता आकडा नक्कीच चिंताजनक आहे. कालच कोरोना बाधितांच्या संख्येने 34 लाखांचा टप्पा पार केला होता. कालच्या दिवसभरात पडलेल्या मोठ्या भरीमुळे 35 लाखांचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सक्रीय रुग्णांची संख्या कमी आहे. कोविड-19 चा रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत असल्याचे समोर येत आहे. (देशात 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज राहणार बंंद, 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार 'ही' सुट)
ANI Tweet:
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असला तरी देशात अनलॉक 4 ची घोषणा झाली आहे. या अंतर्गत अजून काही सेवा-सुविधा सुरु करण्यात येणार आहेत. मात्र कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मेट्रो सेवा सुरु 7 सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन या गोष्टी काटेकोरपणे पाळणे बंधनकारक असणार आहे.