धक्कादायक! भारतात मागील 24 तासांत आढळले 40,425 नवे COVID-19 चे रुग्ण तर 681 रुग्ण दगावल्याची आरोग्य मंत्रालयाची माहिती
तर मागील 24 तासांत 46,336 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 7,00,087 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) अक्षरश: हैदोस घातला असून भारताभोवती कोरोनाचा असलेला विळखा अधिकाधिक घट्ट बनत चालल्याचे चित्र सध्याच्या ताज्या आकडेवारीनुसार मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात (India) कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. मागील 24 तासांत भारतात कोरोनाचे 40,425 नवे रुग्ण आढळले असून 681 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 11,18,043 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 27,497 वर पोहोचला आहे.
देशात सद्य घडीला 3,90,459 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर मागील 24 तासांत 46,336 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 7,00,087 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 62.93 टक्के झाला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी सुद्धा याबाबत माहिती देत देशातील लोकसंख्या, मृत्युदर आणि कोरोना रुग्ण रिकव्हरी रेट पाहता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हंटले होते.
दरम्यान, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधकांनी विकसित केलेली कोविड-19 (Covid-19) च्या लसीच्या चाचणीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक दिसून आले आहे. कोरोना विषाणू विरुद्ध ही लस उत्तम प्रतिसाद देत असल्याची अशी माहिती टेलिग्राफने (Telegraph) दिली आहे.