Indian Stock Market News: भारतीय शेअर बाजारात खरोखरच तेजी? निफ्टीने गाठला नवा उच्चांक; अभ्यासकांचा तर्क काय? घ्या जाणून
भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात नवनवे उच्चांक गाठत असलेला निफ्टीने (Nifty) काल नवा विक्रम केला.
Share Market Really Booming: भारतीय शेअर बाजार अर्थातच इंडियन स्टॉक मार्केट (Indian Stock Market) कोविड महामारी काळात आलेल्या तेजीनंतर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा बहरातना दिसतो आहे. भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात नवनवे उच्चांक गाठत असलेला निफ्टीने (Nifty) काल नवा विक्रम केला. सहाजिकच गुंतवणूक विश्वात यामुळे सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूला गुंतवणूक हा नेहमीच जोखमीचा विषय राहिल्याने बाजारात खरोखरच तेजी आहे की केवळ काही काळासाठी आलेला फुगवटा? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबत एक छोटा रिपोर्टच प्रसिद्ध केला आहे. या वृत्तात म्हटले आहे की, भारतीय स्टॉक निर्देशांकांनी मागील सत्राच्या तुलनेत वाढीव कामगिरी केली. निफ्टीने सर्वकालीन उच्चांक गाठला. निफ्टी 50 ने सोमवारी पहिल्यांदाच 20,000 चा टप्पा ओलांडला.
शेअर बाजार सुरु झाला तेव्हा आज (12 सप्टेंबर) सकाळी निफ्टी 0.27 टक्क्यांनी वाढून 20,050.70 अंकांवर होता. तर सेन्सेक्स 0.37 टक्क्यांनी वाढून 67,376.18 वर होता, 20 जुलैच्या त्याच्या विक्रमी उच्चांकापासून काही 400 अंकांनी घसरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे हा स्वातंत्र्याचा अमृतकाळ असून आगामी काळातही भारतीय शेअर बाजारासाठी अतिशय पोषक वातावरण असेल.
ट्रेडिंगोचे संस्थापक पार्थ न्याती यांनी बाजारातील हिरवळीबद्दल बोलताना सांगितलेकी, काही जागतिक घटकांमुळे बाजारात होत असलेला सुधार हा गुंतवणुकदारांसाठी काही क्षेत्रातले समभाग खरेदीसाठी मोठी संधी असेल. जसे की, ऑट, बँकींग, पीएसयू, आयटी इत्यादी. शेअरबाजारातील निफ्टीच्या वाढीबद्दल बोलताना जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही के विजयकुमार म्हणाले, कमी वाढीच्या जगात भारताच्या वाढीच्या शक्यतांबद्दल आशावाद आणि चीनची झपाट्याने होत असलेली घसरण यामुळे निफ्टीला 20000 चा टप्पा ओलांडता आला आहे. नजीकच्या काळात बाजार सध्याच्या पातळीच्या आसपास एकत्र येण्याची शक्यता आहे. एप्रिल-जून तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाल्यानंतर गेल्या आठवड्यात बेंचमार्क निर्देशांकांमध्ये अनुक्रमे प्रत्येकी 3 टक्क्यांची भर पडल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
भारतीय अर्थव्यवस्थने 2023/24 च्या पहिल्या तिमाही ( एप्रिल,जून) पासून 7.8% जीडीपी वाढताना पाहिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनीही आतापर्यंत चांगला अनुभव घेतला आहे. जीडीपीने 7.8% वाढ राखणे म्हणजे ही बदलत्या आणि चालना मिळत असलेल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण असल्याचे अभ्यासक सांगत आहेत.