Indian Railways: 30 सप्टेंबरपर्यंत रेल्वे गाड्या रद्द केल्याची बातमी खोटी; रेल्वे मंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण
सोशल मिडियावरही अशा आशयाच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत.
कोरोना विषाणू (Coronavirus) चा वाढता प्रादुर्भाव पाहता रेल्वे (Railways) ने आपल्या गाड्या 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्याच्या बातम्या सध्या माध्यमांकडून दिल्या जात आहेत. सोशल मिडियावरही अशा आशयाच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. मात्र रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) सोमवारी स्पष्ट की, रेल्वे बोर्डाने गाड्या पुन्हा सुरू किंवा रद्द करण्याबाबत कोणतेही नवीन परिपत्रक जारी केलेले नाही. मंडळाने असेही सांगितले आहे की, पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेच्या काही सेवा स्थगित राहतील व स्पेशल मेल एक्स्प्रेस गाड्या त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरूच राहतील.
रेल्वेने ट्वीट करत सांगितले आहे, ‘मीडियाचे काही विभाग रिपोर्ट करीत आहेत की, 30 सप्टेंबरपर्यंत रेल्वेने सर्व नियमित गाड्या रद्द केल्या आहेत. मात्र हे खरे नाही. रेल्वे मंत्रालयाने कोणतेही नवीन परिपत्रक जारी केलेले नाही. स्पेशल मेल एक्स्प्रेस गाड्या चालू राहणार आहेत.’
रेल्वे मंत्रालय ट्वीट -
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व मेल/एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील. 11 ऑगस्टच्या अधिसूचनेमध्ये असेही म्हटले आहे की, गाड्या रद्द करण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरी, विशेष मेल आणि एक्स्प्रेस गाड्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील. (हेही वाचा: नाशिक ते बिहार दरम्यान आज पहिली किसान स्पेशल पार्सल ट्रेन धावणार, जाणुन घ्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य)
मुंबईत, अत्यावश्यक सेवा कामगारांसाठी चालविण्यात येणाऱ्या मर्यादित लोकल गाड्यांचेही काम सुरू राहणार आहे. याआधी रेल्वेकडून गाड्या 12 ऑगस्ट पर्यंत बंद राहतील असे सांगण्यात आले होते. मात्र या निर्णयाचा गणेशोत्सवाच्या अगोदर कोकणसाठी नियोजित असणाऱ्या विशेष गाड्यांवर परिणाम होणार नाही. मध्य रेल्वे कोकणसाठी दररोज चार गाड्या चालवणार आहे. लॉक डाऊननंतर पहिल्यांदाच आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरु केली जात आहे.