COVID 19 लॉक डाऊन संपताच भारतीय रेल्वे 15 एप्रिल पासून पुन्हा सुरु करणार तिकीट बुकिंग

हे लॉक डाऊन संपताच दुसऱ्याचा दिवशी पासून म्हणजे 15 एप्रिल पासून रेल्वेच्या तिकीट बुकिंगला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे समजत आहे.

Representational Image | Indian Railways (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांच्या लॉक डाऊनची (Lock Down) घोषणा केली होती त्यानुसार 14 एप्रिल पर्यंत भारतातील सर्व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा या बंद ठेवण्यात येणार आहेत. या बंद असणाऱ्या सेवांमध्ये भारतीय रेल्वेचा (Indian Railway) सुद्धा समावेश होता. 14 एप्रिल पर्यंत भारतभरातील सर्व लांब पल्ल्याच्या व लोकल च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे लॉक डाऊन संपताच दुसऱ्याचा दिवशी पासून म्हणजे 15 एप्रिल पासून रेल्वेच्या तिकीट बुकिंगला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे समजत आहे. आयआरसीटीसी अ‍ॅप (IRCTC App) आणि वेबसाईटवर 15 एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत. राजस्थान पत्रिकाने यासंबंधी वृत्त दिलं आहे.  Lockdown In India: लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही - कॅबिनेट सचिव राजीव गौबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा करताच मेट्रो, रेल्वे , बस सेवा पूर्णपणं बंद करण्यात आल्या होत्या. भारतीय रेल्वेनेही यानंतर 14 एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी ट्रेन सेवा बंद करत फक्त मालवाहतूक करणाऱ्या ट्रेन सुरु ठेवल्या होत्या.तसेच काही भागात जीवनावश्यक वस्तू व वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पार्सल ट्रेन्स सुद्धा सुरु करण्यात आल्या होत्या मात्र प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. 15 एप्रिल पासून रेल्वेचे तिकीट बुकिंग सुरु होताच पुन्हा एकदा भारतीय रेल्वेच्या फेऱ्या नियमित पत्रकानुसार चालवण्यात येतील असा दिलासा मिळत आहे.

दरम्यान, लॉक डाउनच्या काळात बंद करण्यात आलेल्या सर्व रेल्वेच्या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करण्यात येतील असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वास्तविक आजवर युद्ध काळातही कधी भारतीय रेल्वे सेवा बंद ठेवली गेली नव्हती मात्र कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्याने गर्दीला रोखण्यासाठी हा एकमेव पर्याय निवडण्यात आला होता. दुसरीकडे 15 एप्रिल पासून तिकीट बुकिंग सुरु करण्यात येणार असल्याने लॉक डाउनचा कालावधी पुढे वाढवला जाणार नाही हे सुद्धा पुन्हा स्पष्ट झाले आहे.