अमेरिकेकडून 'रोमियो' हेलिकॉप्टर्स खरेदी करणार भारत

फ्रान्ससोबत राफेल डीलनंतर भारत आता अमेरिकेकडून रोमियो हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी सज्ज झाला आहे

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

फ्रान्ससोबत राफेल डीलनंतर भारत आता अमेरिकेकडून रोमियो हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी सज्ज झाला आहे. हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी भारत तब्बल 2 अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर लवकरच यासंबंधिचा करार होईल, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.

सिंगापूर दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांची भेट झाली होती. अमेरिकेच्या मल्टी रोल MH-60 रोमियो अँटी सबमरीन हेलिकॉप्टर्स (Multi-Role MH-60 Romeo Anti-Submarine Helicopters) खरेदी करण्यासाठी भारताचा अमेरिकेसोबत पत्रव्यवहार केला असून भारताला 24 हेलिकॉप्टर्सची गरज असल्याचे त्यात म्हटले आहे.

अर्जेटिनामध्ये होणाऱ्या जी-20 बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे. त्या बैठकीपूर्वी मोदी-पेंस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

रोमियो अँटी सबमरीन ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स फक्त अमेरिकेकडेच असल्याने त्यांच्याकडून 24 हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र त्यानंतर 123 हेलिकॉप्टर्स भारतातच बनवण्याची सरकारची योजना आहे. ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स नक्कीच नौदालाची ताकद वाढवतील. पाणबुडीलाही उद्ध्वस्त करण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे. तसंच चीनच्या हिंदी महासागरातील कुरापतींवर अंकुश ठेवण्यासाठी देखील हे हेलिकॉप्टर्स महत्त्वाचे ठरतील.