भारतामध्ये 24 तासांत सर्वाधिक 14516 नवे रूग्ण तर 375 जणांचा मृत्यू; COVID-19 बाधितांची संख्या 395048 वर

तर 12 हजार 948 जणांनी जीव गमावला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोना बाधितांच्या आकड्याने 3.9 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर 12 हजार 948 जणांनी जीव गमावला आहे. आज आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 14 हजार 516 नवे रूग्ण समोर आले आहेत. ही आत्तापर्यंत एका दिवसात नवे रूग्ण समोर येण्याचा सर्वाधिक आकडा आहे. तर मागील 24 तासामध्ये 375 जणांनी कोव्हिड 19 मुळे आपला जीव गमावला आहे. भारतामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण महाराष्ट्र राज्यात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 395048 पर्यंत पोहचला आहे. यामध्ये 168269 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 213831 जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. मात्र आत्तापर्यंत 12948 जणांचा कोरोनाने जीव गेला आहे. अद्याप जगभरामध्ये कोरोना व्हायरस विरूद्ध ठोस औषध किंवा लस नाही.

ANI Tweet

महाराष्ट्रापाठोपाठ काल दिल्लीमध्येही कोरोनाबाधितांच्या नव्या रूग्णांमध्ये 24 तासांत 3 हजारांपेक्षा अधिकने वाढ नोंदवण्यात आली आहे. काल रात्री संबंधित राज्यांच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये काल 3,137 रूग्ण समोर आलेहोते तर महाराष्ट्रात 3827 रूग्ण आढळले आहेत.

जगभरामध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 8,758,271 वर पोहचला आहे तर मृतांचा आकडा 462,525 पर्यंत गेला. यामध्ये अमेरिका अग्रस्थानी आहे. त्यापाठोपाठ ब्राझिल, रशिया आणि नंतर भारताचा नंबर लागतो. अशी माहिती worldometers.info च्या संकेतस्थळावर दिली आहे.