IPL Auction 2025 Live

Coronavirus in India: देशात आज 4205 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोविड-19 ची लागण

दिवसागणित वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या, मृतांचा आकडा चिंताजनक आहे.

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) कहर सुरु आहे. दिवसागणित वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या, मृतांचा आकडा चिंताजनक आहे. आजही देशात 3,48,421 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 4205 मृतांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत एकूण 3,55,338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या 2,33,40,938 इतकी झाली असून 2,54,197 मृतांची नोंद झाली आहे. 1,93,82,642 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 37,04,099 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे 17,52,35,991 नागरिकांना लस देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिली आहे.

देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगढ, बिहार आणि गुजरात या राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदीगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार येथे देखील रुग्णसंख्या कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ANI Tweet:

कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. मात्र लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरणात शिथिलता आली आहे. मात्र कोविड-19 चा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक आहे. तसंच देशाची लोकसंख्या प्रचंड असल्याने लसीकरणाचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.