India vs Pakistan Handshake: टॉस दरम्यान सूर्यकुमार आणि सलमान आगाने टाळले हस्तांदोलन; मैदानाबाहेर चर्चांना उधाण
भारतीय संघाने गेल्या वर्षीच्या आशिया चषकापासून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. विशेषतः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी कटुता आली आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामन्याची सुरुवात रविवारी अनपेक्षित तणावाने झाली. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर टॉससाठी आलेले भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यांनी पारंपरिक हस्तांदोलन (Handshake) टाळल्याचे दिसून आले. या घटनेमुळे क्रिकेट विश्वात तर्कवितर्कांना उधाण आले असून, सामन्याच्या रणनीतीपेक्षा या वादाचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा होत आहे.
टॉस दरम्यान काय घडले?
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टॉस झाल्यानंतर दोन्ही कर्णधारांनी एकमेकांशी हस्तांदोलन न करताच आपापल्या दिशेला जाणे पसंत केले. या दरम्यान दोघांमध्ये नजरभेटही टाळल्याचे जाणवले. वास्तविक, क्रिकेटमध्ये टॉसच्या वेळी आणि सामन्यानंतर हस्तांदोलन करण्याची एक जुनी परंपरा आहे, जी या सामन्यात पाळली गेली नाही.
'नो हँडशेक' धोरणामागचे पार्श्वभूमी
भारतीय संघाने गेल्या वर्षीच्या आशिया चषकापासून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. विशेषतः पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी कटुता आली आहे. सूर्यकुमार यादवला याबद्दल विचारले असता, त्याने "२४ तास थांबा, तुम्हाला उत्तर मिळेल," असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले होते.
माजी क्रिकेटपटूंकडून टीका
या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी या भूमिकेवर टीका करताना म्हटले आहे की, "हस्तांदोलन न करणे ही एक पोरकट गोष्ट आहे. एकतर खेळाच्या भावनेने खेळा किंवा खेळूच नका." दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने खेळाची भावना जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते, परंतु मैदानावरील कृती मात्र वेगळीच दिसून आली.
या वादाने ग्रुप-ए मधील या महत्त्वाच्या सामन्यात अधिकच रंगत आणली आहे. दोन्ही संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असून, आजचा निकाल सुपर-८ च्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)