COVID-19 मुळे सर्वात वाईट परिस्थिती जरी उद्भवली तरी भारत सरकार सज्ज आहे- केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन
हर्षवर्धन यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Union Health Minister Dr. Harsh Vardhan) यांनी भारत सरकारच्या वतीने देश कोरोनाशी लढा देण्यास समर्थ आहे असा विश्वास दर्शवला आहे. इतर अनेक विकसित देशांप्रमाणे आपल्या देशातही कोरोनामुळे (Coronavirus) भीषण परिस्थिती निर्माण होईल असे म्हणत नाही आहोत मात्र जर का अशी परिस्थिती किंबहुना वाईटात वाईट परिस्थिती उद्भवली तरी देश हा लढा देण्यासाठी तयार आहे अशा शब्दात डॉ. हर्षवर्धन यांनी विश्वास व्यक्त केला आहे. आज डॉ. हर्षवर्धन हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पूर्वेकडील राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधत होते. कोरोना व्हायरसचे दिवसभरातील अपडेट्स जाणुन घ्या एका क्लिक वर
डॉ. हर्षवर्धन यांनी पुढे कोरोनामुळे देशात झालेल्या मृत्यूंची सरासरी आकडेवारी सांगत त्यानुसार देशात केवळ 3.3 टक्के मृत्यू दर असून देशात कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ही 29.9 इतकी आहे असे सांगितले. हे उत्तम संकेत आहेत त्यामुळे आपण अजूनही सुरक्षित आहोत असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
देशात 843 हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयात एकूण 1,65,991 इतके बेड आहेत. देशात 1,991 स्वास्थ्य केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्रात सुद्धा वेगळे 1,35,643 बेड आहेत. यामध्ये विलगीकरणासाठी वेगळे विभाग तसेच आयसीयूचे विभाग तयार करण्यात आले आहेत. केंद्र सरकारी खर्चातून राज्य सरकारांना 69 लाख एन-95 मास्क देण्यात आले आहेत 32.76 लाख पीपीई किट्स देण्यात आले आहेत. सरकार वैद्यकीय विभागांना आवश्यक ते सर्व निर्णय घेण्याची मुभा देत आहे.
दरम्यान, कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास, देशात कोरोना रुग्णांची संख्या 59,662 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1981 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 39,834 रुग्णांवर उपचार सुरु असून 17847 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.