India Earthquake Warning: उत्तराखंडमध्ये येऊ शकतो Turkey-Syria सारखा विनाशकारी भूकंप; जमिनीखाली होत आहे खळबळ- Reports
हे क्षेत्र जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश पर्यंत विस्तारित आहे. इथे भूकंप झाल्यास होणारे नुकसान हे, इथली लोकसंख्येची घनता, इमारती, पर्वत किंवा मैदानावरील बांधकामाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.
तुर्किये व सिरीयामधील (Turkey-Syria Earthquakes) भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये लाखो लोक जखमी झाले आहेत आणि तितकेच बेघरही झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तुर्किये आणि सिरीयामध्ये बचाव ऑपरेशन सतत चालू आहे. या सर्वांच्या दरम्यान, भारताच्या नॅशनल जिओलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI) च्या मुख्य वैज्ञानिकांनी उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) तुर्कस्तानसारख्या भूकंपांचा इशारा दिला आहे. ते म्हणतात की उत्तराखंडमध्येही अधिक तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो.
डॉ. एन. पूर्णाचंद्र राव यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, उत्तराखंड प्रदेशात पृष्ठभागाखाली बरेच तणाव निर्माण होत आहेत आणि हे तणाव दूर करण्यासाठी भूकंप येणे अनिवार्य आहे. या भूकंपाची तारीख आणि वेळेचा अंदाज येऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही हिमालयीन प्रदेशात उत्तराखंडवर केंद्रित सुमारे 80 भूकंपाची स्टेशन उभारली आहेत. आम्ही रिअल टाइममध्ये परिस्थितीचे निरीक्षण करीत आहोत. आमच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, इथल्या जमिनीखाली बराच काळ तणाव जमा होत आहे. आमच्याकडे या क्षेत्रात जीपीएस नेटवर्क आहे. इथले जीपीएस पॉईंट्स थरथर कापत आहेत, जे पृष्ठभागाखाली बदल दर्शवितात.’
डॉ. राव म्हणाले की, ‘पृथ्वीसोबत काय घडत आहे हे निर्धारित करण्यासाठी व्हेरिओमेट्रिक जीपीएस डेटा प्रोसेसिंग ही एक विश्वसनीय पद्धत आहे. आम्ही नेमकी वेळ आणि तारखेचा अंदाज घेऊ शकत नाही, परंतु उत्तराखंडमध्ये कधीही मोठा भूकंप होऊ शकतो.’ डॉ. राव म्हणाले की, तुर्कीमध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता व 8 आणि त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांना ‘ग्रेट भूकंप’ म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या तुर्किये व सिरीयामधील भूकंपाला मोठा भूकंप म्हणता येणार नाही, परंतु निकृष्ट दर्जाच्या बांधकामासह अनेक कारणांमुळे तुर्कियेमध्ये मोठा विनाश झाला. (हेही वाचा: निर्लज्जपणाचा कळस! मागच्या वर्षी तुर्कस्तानने पाकिस्तानला पुरात पाठवलेले पाकिटे पाकिस्तानने पुन्हा तुर्कीला 'भूकंप मदत'च्या नावाने पाठवली)
ते पुढे म्हणाले की, हिमालयीन प्रदेशात 8 पेक्षा जास्त तीव्रतेची भूकंप होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेश पर्यंत विस्तारित आहे. इथे भूकंप झाल्यास होणारे नुकसान हे, इथली लोकसंख्येची घनता, इमारती, पर्वत किंवा मैदानावरील बांधकामाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.