India-China Clash: चीन मुद्द्यावर मोदींचे मौन, राहुल गांधी यांचे सवाल; पंतप्रधान बोलत का नाहीत? भारताचे जवान मारण्याची चीनची हिम्मतच कशी झाली?
असे असतानाही पंतप्रधान मोदी अथवा केंद्र सरकार पुढे येऊन काहीही सांगायला तयार नाहीत. संसदीय लोकशाहीत अशा प्रकारचे मौन अस्वीकारार्ह आहे. काँग्रेस पक्षासह सर्व देश सरकारच्या पाठिशी ठाम उभा आहे. सरकारने मात्र सत्य काय ते जनतेला सांगायला हवे.
पूर्व लद्दाख प्रदेशातील गलवान (Galwan) खोऱ्यात भारत-चीन (India-China) सैन्यात झालेल्या झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने नेमकी काय कारवाई केली याबाबत संपूर्ण देशाला उत्सुकता आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही याच मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की चीनने आपले सैनिक मारण्याची हिम्मत केलीच कशी? पंतप्रधान मोदी हे सुद्धा या विषयावर काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान मोदी या विषयावर काहीच कसे बोलत नाहीत?
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? ते का लपत आहेत? लपवत आहेत? देश जाणून घेऊ इच्छितो की नेमके काय झाले आहे. सीमेवर नेमकी स्थिती काय आहे. आमच्या भूप्रदेशावर येण्याची त्यांची हिंमतच कशी झाली? (हेही वाचा, India-China Clash: पंतप्रधान मोदीजी आपले 20 जवान शहीद झाले, आपण काय केले? काहीतरी बोला! शिवसेना खासदार संजय राऊत यांचा निशाणा)
राहुल गांधी यांनी बुधवारी केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय सैन्य आणि जवानांबद्दल माझ्या मनात जी भावना आहे ती मी कोणत्याही शब्दांतून व्यक्त करु शकत नाही. ज्यांनी या देशासाठी आपल्या जीवाचे बलीदान दिले त्या सर्वांप्रति माझ्या संवेदना आहेत. या अत्यंत कठीण काळात सर्व शहिदांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, भारत-चीन सैन्यात झालेल्या झटापटीत भारताचे जावान शहीद झाले. असे असतानाही पंतप्रधान मोदी अथवा केंद्र सरकार पुढे येऊन काहीही सांगायला तयार नाहीत. संसदीय लोकशाहीत अशा प्रकारचे मौन अस्वीकारार्ह आहे. काँग्रेस पक्षासह सर्व देश सरकारच्या पाठिशी ठाम उभा आहे. सरकारने मात्र सत्य काय ते जनतेला सांगायला हवे.