कृषी कायद्यासंदर्भात मी शेतकऱ्यांपासून एका फोन कॉलच्या अंतरावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

याबरोबर सरकारने शेतक-यांना दिलेली ऑफर कायम असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Prime Minister Narendra Modi (Photo Credits: PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज अर्थसंकल्पापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यावेळी दिल्लीत सुरु असलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतक-यांच्या आंदोलनावर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी "आम्ही शेतक-यांशी चर्चा करण्यास तयार असून चर्चेतूनच यावर तोडगा निघू शकतो" असे सांगितले. याबरोबर सरकारने शेतक-यांना दिलेली ऑफर कायम असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत शेतक-यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद आणि अन्य नेत्यांनी शेतक-यांचा प्रश्न उपस्थित केला. यावर "कृषी कायद्यावर आम्ही फक्त एक फोन कॉल दूर आहोत. जर शेतक-यांची इच्छा असेल तर केंद्र सरकार चर्चा करायला तयार आहे" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.हेदेखील वाचा- Farmers Protest: जो पर्यंत सरकार सोबत बातचीत होत नाही तो पर्यंत आंदोलन संपणार नाही- राकेश टिकैत

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक झाली. जवळपास सर्वच पक्षांनी या बैठकीत भाग घेतला. लोकसभेत विधेयकाव्यतिरिक्त चर्चा करण्याची विरोधकांची मागणी असून त्यासाठी सरकार तयार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चेची मागणीही विरोधकांनी केली आहे, त्यासाठी आम्हीही सहमत आहोत. पंतप्रधान म्हणाले की आम्ही कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद, टीएमसीचे सुदीप बंड्योपाध्याय, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि शिरोमणई अकाली दलाचे बलविंदरसिंग भुंडार यांनी शेतकरी आंदोलनावर दीर्घ भाषण केले. यावेळी जेडीयूचे खासदार आरसीपी सिंह यांनी कृषी कायद्यांचे समर्थन केले.