Honour Killing: गोत्राबाहेर लग्न केल्याने आई वडिलांनीच गळा दाबून केली मुलीची हत्या; कुटुंबातील इतर सदस्यांनी दिली साथ

एका 25 वर्षाच्या युवतीने आपल्या गोत्राबाहेरील व्यक्तीशी लग्न केल्याने, संतप्त पालकांनी तिची हत्या केली आहे

Honour killing | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) मधून ऑनर किलिंग (Honour Killing) चे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 25 वर्षाच्या युवतीने आपल्या गोत्राबाहेरील व्यक्तीशी लग्न केल्याने, संतप्त पालकांनी तिची हत्या केली आहे. पालकांनी त्यांच्या मुलीचा गळा आवळून खून केला. इतकेच नव्हे तर, हत्येनंतर वडिलांनी मुलीचा मृतदेह पूर्व दिल्लीतील आपल्या घरापासून, 80 किमी अंतरावर यूपीच्या सिकंदराबादकडे नेऊन कालव्यात फेकला.

या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी या मुलीचे वडील रवींद्र, आई सुमन, काका संजय आणि ओम प्रकाश, आत्येभाऊ प्रवेश आणि नात्यातील आणखी एक जावई अंकित याला अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी या सर्वांना अपहरण आणि खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. याबाबत बोलताना डीसीपी (पूर्व) जसमीत सिंह म्हणाले की, 'या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान, कुटुंबियांनी सांगितले की, आपल्या मुलीने दुसऱ्या एखाद्या गोत्रातील व्यक्तीशी लग्न करणे हे आम्हाला मान्य नव्हते म्हणून हे कृत्य घडले.' हे प्रकरण प्रथम 17 फेब्रुवारी रोजी समोर आले. पिडीतेचे पती अंकित भाटी यांच्या तक्रारीच्या आधारे न्यू अशोक नगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासामध्ये कुटुंबियांचे कॉल डीटेल्स चेक केले गेले त्यावेळी 30 जानेवारीच्या सुमारास काही क्रमांकावर बरीच चर्चा झाल्याचे आढळले. याच आधाराव पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला.

(हेही वाचा: पुण्यात कॅम्प परिसरात 'ऑनर किलिंग'चा थरार; बहिणीच्या नवऱ्याचा भावाकडून चाकूने वार करून खून)

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'युवतीचे शेजारील अंकितशी 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघांनी ऑक्टोबरमध्ये गुपचूप विवाह केला होता, परंतु ते आपापल्या कुटुंबियांसमवेत राहत होते. 30 जानेवारी रोजी युवतीने आपल्या आईवडिलांना आणि बाकीच्या कुटुंबियांना लग्नाविषयी सांगितले. ही बातमी ऐकताच कुटुंबियांच्या संतापला पारावार उरला नाही व त्यांनी तिचा गळा दाबून खून केला.'