Coronavirus Update in India: भारतात मागील 24 तासांत कोविड-19 रुग्णांच्या संख्येत झाली सर्वाधिक वाढ! 49,310 रुग्णांसह कोरोना संक्रमितांची संख्या 12,87,945 वर
भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये आहेत.
भारतात कोरोना व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असून गेल्या 24 तासांत देशात कोरोना बाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देशात मागील 24 तासांत 49,310 रुग्ण आढळले असून देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 12,87,945 वर पोहोचली आहे. तसेच काल (23 जुलै) दिवसभरात 740 रुग्ण दगावले असून मृतांचा एकूण आकडा 30,601 वर पोहोचला आहे. सद्य घडीला भारतात 4,40,135 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
त्याचबरोबर काल दिवसभरात 34,603 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 8,17,209 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये आहेत.
भारतात 23 जुलै पर्यंत 1,54,28,170 कोविड-19 च्या चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात 3,52,801 नमुन्यांच्या चाचण्या घेण्यात आल्याचे ICMR ने सांगितले आहे.
यात एक दिलासादायर गोष्ट म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण भारत ज्या गोष्टीची वाट पाहात होता ते COVID-19 वरील औषध लवकरच भारतात लाँच होणार आहे. फार्मा कंपनी सिपला फेविपिराविर (Favipiravir) हे औषध भारतात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयारीत असल्याचा वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR) ने दावा केला आहे. या अँटी व्हायरल औषधाचे झालेले 3 ट्रायल यशस्वी पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषत: सौम्य आणि कमी लक्षणे असलेल्या कोविड-19 च्या रुग्णांमध्ये हे औषध गुणकारी ठरले आहे.