North India Rain: उत्तर भारतात पावसाचा थैमान, आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू

यामध्ये आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बहुतांश जलविद्युत प्रकल्पांचे पावसामुळं नुकसान झालं आहे.

North India Rain (Image Credit - ANI Twitter)

उत्तर भारतात पावसाने (North India Rain) थैमान घातले असून या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आत्तापर्यंत उत्तर भारतात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या (NDRF) अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीची माहिती घेतली आहे. (हेही वाचा - Uttar Pradesh Rain: उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचे थैमान, 34 लोकांचा मृत्यू)

हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळं अनेक भागात पूर आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बहुतांश जलविद्युत प्रकल्पांचे पावसामुळं नुकसान झालं आहे. शेकडो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झालं आहे. एकट्या शिमला जिल्ह्यात सोमवारी भूस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला. शिमल्याच्या थेओग उपविभागात सोमवारी सकाळी एका घरावर दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला.

उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांत सरासरीपेक्षा 2.5 ते 3 पट जास्त पाऊस झाला आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळं वाहनांचे अपघात आणि घरांची पडझड होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सरकारने लोकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 11 ते 12 जुलैसाठी, कुमाऊं आणि त्याच्या लगतच्या गढवाल, चमोली भागात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, पंजाब आणि हरियाणामध्ये मुसळधार पावसामुळं नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानमध्ये सात आणि उत्तर प्रदेशमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात दिल्लीतील यमुनेसह अनेक नद्यांना पूर आला आले आहे. उत्तर भारतातील अनेक भागात अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी वाहने पुरात वाहून गेल्याचे दिसून आले. उत्तर भारतातील चार राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा सामना करण्यासाठी एकूण 39 एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली आहेत.