जेवणाच्या दर्जाबद्दल टीका करणाऱ्या निलंबित BSF जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू
लष्काराच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, अशी थेट टीका करणाऱ्या बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
लष्काराच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, अशी थेट टीका करणाऱ्या बीएसएफ जवान तेज बहादूर यादव (Tej Bahadur Yadav) यांच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत असून हा आत्महत्येचा प्रकार असल्याची प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
तेज बहादूर यादव हे रेवाडीतील शांती विहार कॉलनीमध्ये राहत होते. त्यांच्या राहत्या घरी त्यांचा 22 वर्षीय मुलगा रोहितचा मृतदेह आढळला. रोहित दिल्ली विद्यापीठात शिकत असून सुट्टीसाठी तो घरी आला होता. रोहितचे वडिल तेज बहादूर प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. आई ऑफिसवरुन परतल्यानंतर रोहितच्या खोलीची दरवाजा बंद होता. खूप वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी पोलिसांना मदत घेतली. पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडला असता रोहितचा मृतदेह पलंगावर पडलेला दिसला. त्याच्या हातात पिस्तुलही होतं.
जवानांना उत्तम प्रतीचे जेवण मिळत नसल्याचे आरोप तेज बहादूर यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले होते. यासंदर्भातील व्हिडिओ देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता. यावरुन प्रचंड वाद उसळला. या प्रकरणाची दखल खुद्द पंतप्रधान कार्यालयालाही घ्यावी लागली. यानंतर मात्र शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी यादव यांना निलंबित करण्यात आलं.